गडचिरोली प्रतिनिधी दिनांक 28 फेब्रुवारी 2026
महिलांच्या आरोग्याबाबत समाजात अजूनही असलेली भीती, लाज आणि दुर्लक्ष दूर करण्याच्या उद्देशाने “We Care, & Cure” या प्रभावी संकल्पनेअंतर्गत गर्भाशय मुखाच्या कर्करोग तपासणी व उपचार शिबीर गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात यशस्वीरीत्या पार पडले.
सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रकाश आबिटकर आरोग्यमंत्री यांच्या नेतृत्वात दिनांक २७ फेब्रुवारी २०२६ रोजी बाह्यरुग्ण विभागात हा उपक्रम राबविण्यात आला.
महिलांच्या आरोग्य संरक्षणासाठी आणि गर्भाशय मुखाच्या कर्करोगपूर्व अवस्थेतील जखमांचे वेळेत निदान व उपचार करण्याच्या वचनबद्धतेतून “We Care, & Cure” हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत असून, त्याची सुरुवात गडचिरोली जिल्ह्यापासून करण्यात आली, ही बाब जिल्ह्यासाठी अभिमानास्पद ठरली.
या उपक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ. वर्षा लहाडे, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली यांनी भूषविले. त्या IMA State अंतर्गत HPV Vaccination, Cervical & Breast Cancer Committee च्या अध्यक्षही आहेत. सहअध्यक्ष म्हणून डॉ. ज्योती सूळ यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
कार्यक्रमास राज्य व विभागीय स्तरावरील मान्यवरांनी दूरदृष्टी प्रणाली (VC) द्वारे उपस्थिती लावली. यामध्ये श्री. मंगेश चिवटे, विशेष कार्य अधिकारी (OSD), उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष, डॉ. शशीकांत शर्भरकर, उपसंचालक (नागपूर मंडळ), डॉ. संतोष कुलकर्णी, सहअध्यक्ष IMA महाराष्ट्र, डॉ. विक्रांत देसाई यांच्यासह अनेक तज्ज्ञांचा सहभाग होता.
प्रत्यक्ष उपस्थितीत प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. मंजूषा गिरी, अध्यक्ष Indian Medical Association Maharashtra, डॉ. छाया उईके, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. प्रविण किलनाके, अध्यक्ष IMA गडचिरोली, यांच्यासह स्त्रीरोग, कर्करोग व सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील अनेक तज्ज्ञ डॉक्टर सहभागी झाले होते.
मार्गदर्शन करताना डॉ. प्रविण किलनाके यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, ३० वर्षांवरील प्रत्येक महिलेने गर्भाशय मुखाच्या कर्करोगाशी संबंधित कोणतीही लक्षणे आढळल्यास त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी.
तर डॉ. मंजूषा गिरी यांनी महिलांना आवाहन केले की, योग्य वेळी निदान व उपचार झाल्यास गर्भाशय मुखाचा कर्करोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. लाज, भीती किंवा गैरसमज बाजूला ठेवून नियमित तपासणी करणे काळाची गरज आहे.
अध्यक्षीय भाषणात डॉ. वर्षा लहाडे यांनी “We Care, & Cure” या संकल्पनेचा मर्म उलगडताना सांगितले की, प्रत्येक रुग्णाला संवेदनशील, दर्जेदार आणि वेळेत आरोग्यसेवा देणे ही आमची जबाबदारी आहे.
घर, कुटुंब आणि समाज सांभाळणारी महिला अनेकदा स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करते, ही चिंतेची बाब असून गर्भाशय मुख कर्करोगाशी संबंधित कोणतीही लक्षणे आढळल्यास ग्रामीण, उपजिल्हा किंवा जिल्हा रुग्णालयात त्वरित तपासणी करावी, असे त्यांनी ठामपणे नमूद केले.
या शिबिरात गडचिरोली, चामोर्शी, धानोरा व आरमोरी येथील १३ VIA पॉझिटिव्ह महिलांवर प्रत्यक्ष तपासणी करून उपचार करण्यात आले. ही तपासणी डॉ. वर्षा लहाडे व डॉ. प्रशांत आखाडे, स्त्रीरोगतज्ज्ञ यांनी केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रेरणा राऊत यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. छाया उईके यांनी केले.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. मृनाली रामटेक, निलेश सुभेदार, राहुल कंकनालवार, राहुल चावरे, दिनेश खोरगडे, नांदगाये सिस्टर, मनोज गेडाम, कैलाश आत्राम, तूराब शेख, प्रियंका शेडमाके, वैशाली बोबाटे, शिल्पा सरकार, शितल काळबांधे, स्नेहा गेडाम, प्रतिभा आत्राम, प्रणाली ठेंगणे, भूपेश दरडमारे यांच्यासह जिल्हा सामान्य रुग्णालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.
महिलांच्या आरोग्यासाठी “We Care, & Cure” हा केवळ कार्यक्रम नसून, एक सामाजिक जबाबदारी आहे—आणि गडचिरोलीतून सुरू झालेला हा प्रवास संपूर्ण महाराष्ट्रातील महिलांसाठी आशेचा किरण ठरत आहे.
