कोरची–कुरखेडा मार्गावरील बेडगाव घाटात बिबट्याचे दर्शन…
नागरिकांनी जंगलात वास्ते तोडण्यासाठी जीव धोक्यात घालू नये – आवाहन

कोरची विशेष प्रतिनिधी दिनांक:–25 ऑगस्ट 2025
आज सकाळी सुमारे १०:३० वाजता कोरची–कुरखेडा मार्गावरील बेडगाव घाट परिसरात वाहनधारकांना बिबट्याचे प्रत्यक्ष दर्शन झाले. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, बेडगाव घाटातील मोठ्या चढावर उजव्या बाजूच्या पायवाट रस्त्याजवळील झुडपाखाली बिबट्या निवांत बसलेला दिसला.
त्या वेळेस घाटातून अनेक दुचाकीस्वार जंगलात बांबू वास्ते (वास्त्याचे काठ्या) तोडण्यासाठी जात होते. परंतु त्या परिसरात बिबट्याची उपस्थिती लक्षात घेता अशा प्रकारे जीव धोक्यात घालून जंगलात प्रवेश करणे धोकादायक ठरू शकते, असे स्थानिक नागरिकांनी स्पष्ट केले.
बेडगाव घाट परिसर दाट जंगल आणि वन्यजीवांच्या अधिवासासाठी ओळखला जातो. दरम्यान, वनविभागाने नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः बांबू वास्ते तोडण्यासाठी किंवा इतर कारणांसाठी जंगलात विनाकारण प्रवेश करू नये.
स्थानिक ग्रामस्थांनीही नागरिकांना सावधानतेचा इशारा देत, “जंगल हे वन्यजीवांचे घर आहे, त्यामुळे माणसांनी आपल्या सुरक्षेसाठी योग्य ती खबरदारी घ्यावी. वन्यप्राण्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून त्यांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी,” असे सांगितले.
अचानक मिळालेल्या बिबट्याच्या दर्शनामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, तरीही नैसर्गिक संतुलन राखण्यासाठी नागरिकांनी सतर्कतेने व जबाबदारीने वागण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.