सिरोंचा पोलीस स्टेशन तर्फे रूट मार्चचे प्रात्यक्षिक….

सिरोंचा विशेष प्रतिनिधी दिनांक 25 ऑगस्ट 2025
सिरोंचा पोलीस स्टेशन तर्फे आगामी गणेशोत्सव, शारदोत्सव, दसरा व दिवाळी या सणांच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच नागरिकांनी शांततेत व सुरक्षित वातावरणात सण साजरे करावेत या उद्देशाने रूट मार्चचे प्रात्यक्षिक काढण्यात आले.
हा रूट मार्च उपविभागीय पोलीस अधिकारी संदेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली तर पोलीस निरीक्षक निखिल पॅटिंग यांच्या नेतृत्वात पार पडला. यावेळी सिरोंचा पोलीस स्टेशनचे अधिकारी व जवान मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मार्चची सुरुवात पोलीस स्टेशन येथून करण्यात आली. त्यानंतर शहरातील मुख्य चौक, बस स्टॅण्ड परिसर, गजबजलेल्या रस्त्यांतून हा रूट मार्च काढण्यात आला. या प्रात्यक्षिकाद्वारे नागरिकांना कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन करण्यात आले तसेच कुठल्याही अफवांना बळी पडू नये याबाबतही जनजागृती करण्यात आली.
पोलीस दलाच्या या रूट मार्च प्रात्यक्षिकामुळे शहरात सुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले. नागरिकांमध्ये आत्मविश्वास वाढविण्याबरोबरच सामाजिक सलोखा टिकवून ठेवण्याचा संदेशही देण्यात आला.
यावेळी मोठ्या संख्येने पोलीस जवान सज्ज अवस्थेत दिसत होते. शहरातील विविध संवेदनशील भागांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे.
विदर्भ न्यूज 24 चे आवाहन : नागरिकांनी आगामी सर्व सण शांततेत, बंधुत्वाच्या वातावरणात व कायद्याचे पालन करून साजरे करावेत. कुठल्याही संशयास्पद हालचालीची माहिती तात्काळ पोलीस स्टेशनला द्यावी.