गडचिरोली विशेष प्रतिनिधी दिनांक 27 फेब्रुवारी 2026
गडचिरोली जिल्ह्यातील वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या कमलापूर एलिफंट कॅम्प येथे १७ ते २३ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेला विशेष हत्ती प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. हत्ती आणि महावत यांच्यातील समन्वय अधिक सशक्त करणे, सुरक्षितता वाढवणे तसेच दैनंदिन कार्यपद्धती अधिक शास्त्रशुद्ध व मानवी बनवणे, हा या प्रशिक्षणामागील मुख्य उद्देश होता.
हा संपूर्ण प्रशिक्षण उपक्रम Lloyds Metals and Energy Limited (LMEL) यांच्या कॉर्पोरेट एन्व्हायर्नमेंटल रिस्पॉन्सिबिलिटी (CER) अंतर्गत राबविण्यात आला असून, पर्यावरण संवर्धन आणि वन्यजीव व्यवस्थापनात खासगी उद्योगांनी जबाबदारीने पुढाकार घ्यावा, याचे हे ठळक उदाहरण मानले जात आहे. प्रशिक्षणासाठी आवश्यक असलेला संपूर्ण निधी आणि व्यवस्थात्मक सहकार्य LMEL कडून पुरविण्यात आले.
या प्रशिक्षणासाठी देशातील नामांकित Teppakadu Elephant Camp, Mudumalai Tiger Reserve येथून अनुभवी महावत आणि पशुवैद्यकीय तज्ज्ञ डॉ. राजेश यांची विशेष नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी हत्तींच्या नैसर्गिक वर्तनाचा अभ्यास, आदेश देण्याच्या वैज्ञानिक पद्धती, सकारात्मक कंडीशनिंग तंत्र, मानवी दृष्टिकोनातून हाताळणी, शिस्तबद्ध सवयी, वर्तन व्यवस्थापन तसेच आरोग्य तपासणी व सातत्यपूर्ण निरीक्षण यावर सखोल मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणामुळे महावतांची कार्यक्षमता वाढण्यासोबतच हत्तींच्या आरोग्य व सुरक्षिततेबाबत अधिक संवेदनशील दृष्टिकोन विकसित झाल्याचे दिसून आले.
हा कार्यक्रम महाराष्ट्राचे प्रधान मुख्य वनसंरक्षक व मुख्य वन्यजीव संरक्षक श्री. एम. एस. रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच माजी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) आणि LMEL चे सल्लागार श्री. महिप गुप्ता यांच्या सहकार्याने राबविण्यात आला. सिरोंचा वन विभागाचे उपवनसंरक्षक, LMEL चे वरिष्ठ अधिकारी तसेच वन्यजीव क्षेत्रातील तज्ज्ञांचा या संपूर्ण उपक्रमात सक्रिय सहभाग होता.
प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन कमलापूरचे रेंज फॉरेस्ट ऑफिसर, प्रोबेशनरी रेंज फॉरेस्ट ऑफिसर तसेच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. वन विभागातील अधिकारी आणि LMEL चे प्रतिनिधी यांच्यातील समन्वयामुळे कार्यक्रमाचे आयोजन काटेकोरपणे आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले.
कमलापूर एलिफंट कॅम्पच्या सर्वांगीण विकासासाठी LMEL कडून सिरोंचा येथील वन विभागीय अधिकाऱ्यांना ₹३४.५३ लाखांची आर्थिक मदत देण्यात आली असून, याशिवाय कॅम्पमधील पायाभूत सुविधा, निवास व्यवस्था, आरोग्य सेवा आणि इतर आवश्यक सोयीसुविधांच्या उन्नतीसाठी कंपनीकडून थेट ₹४० लाखांचा अतिरिक्त खर्च करण्यात येणार आहे. या गुंतवणुकीमुळे कॅम्पची कार्यक्षमता वाढण्यासोबतच भविष्यात इको-टुरिझमच्या दृष्टीनेही हे ठिकाण अधिक आकर्षक ठरणार असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.
प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप कमलापूर रेंज कार्यालयात आयोजित करण्यात आला. यावेळी सहाय्यक वनसंरक्षक (IFS), रेंज फॉरेस्ट अधिकारी, वन विभागाचे कर्मचारी तसेच एलिफंट कॅम्पमधील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रशिक्षणामुळे हत्ती व्यवस्थापन अधिक शास्त्रशुद्ध, सुरक्षित आणि दीर्घकालीन दृष्टिकोनातून प्रभावी होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
वन विभाग आणि LMEL यांच्या संयुक्त प्रयत्नातून कमलापूर एलिफंट कॅम्प केवळ प्रशिक्षण केंद्र न राहता, वन्यजीव संवर्धन, संशोधन आणि पर्यावरणपूरक पर्यटनाचे एक आदर्श केंद्र म्हणून विकसित होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे….
