# अल्पवयीन वाहनचालक, वेगमर्यादा व जड वाहतुकीवर कडक उपाययोजना करा – जिल्हाधिकारी* – VIDARBHANEWS 24
आपला जिल्हा

अल्पवयीन वाहनचालक, वेगमर्यादा व जड वाहतुकीवर कडक उपाययोजना करा – जिल्हाधिकारी*

*गडचिरोली शहरातील वाहतूक समस्यांवर आढावा बैठक*

गडचिरोली, विशेष प्रतिनिधी दिनांक 17 डिसेंबर 2025

शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेस प्राधान्य देत वाहतूक व्यवस्थेत शिस्त, नियंत्रण व सुरक्षितता आणण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले.

गडचिरोली शहरातील वाढत्या वाहतूक समस्यांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी श्री. पंडा यांच्या अध्यक्षतेखाली काल जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक श्री. निलोत्पल, निवासी उपजिल्हाधिकारी अस्मिता मोरे तसेच वाहतूक पोलिस, शहर पोलिस व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

शहरातील वाहतूक अधिक सुरक्षित, शिस्तबद्ध व सुरळीत करण्याच्या दृष्टीने शहरातील वेगमर्यादा पालन, अल्पवयीन मुलांचे धोकादायक वाहनचालन, रॉंग साईड वाहनचालन, दुचाकीवरील ट्रिपल सीट प्रवास तसेच जड व मालवाहू ट्रकच्या शहरातील हालचाली यावर कडक उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिल्या.

शहरातील मुख्य रस्ते, शाळा-महाविद्यालय परिसर, वस्ती भाग व वर्दळीच्या चौकांमध्ये वेगमर्यादा काटेकोरपणे अंमलात आणण्याचे निर्देश देण्यात आले. वेगमर्यादा उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर नियमित तपासणी करून दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी वाहतूक व पोलिस यंत्रणेला दिले. अपघातप्रवण व वर्दळीच्या ठिकाणी आवश्यक तेथे रमलर स्ट्रिप्स बसविणे, सूचना फलक व स्पीड ब्रेकर अधिक प्रभावी करण्याबाबतही यावेळी चर्चा झाली.

अल्पवयीन मुलांकडून दुचाकी व चारचाकी वाहने चालवण्याच्या वाढत्या घटनांबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी पालक, शाळा-महाविद्यालये व पोलिस यंत्रणांनी समन्वयाने जनजागृती करण्याचे, तसेच वाहतूक कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या अल्पवयीन वाहनचालकांवर आणि त्यांना वाहन देणाऱ्या पालकांवरही नियमानुसार कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले.

यासोबतच शहरात रॉंग साईड वाहनचालन, दुचाकीवर ट्रिपल सीट प्रवास तसेच बेदरकार व नियमबाह्य वाहनचालनामुळे अपघातांचा धोका वाढत असल्याने अशा वाहनचालकांवर विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई करण्याचे सांगितले. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई सातत्याने करण्यात यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शहरातील वाहतूक नियंत्रण अधिक प्रभावी करण्यासाठी वाहतूक पोलिसांचे संख्याबळ वाढविणे, तसेच मुख्य चौकांमध्ये सिग्नल यंत्रणा नियमित व कार्यान्वित ठेवण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

शहरातील जड वाहनांची, विशेषतः ट्रकची, वाहतूक नियंत्रीत करण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर, वेळापत्रक निर्धारण व आवश्यक त्या ठिकाणी निर्बंध लावण्याबाबत संबंधित विभागांनी तातडीने कार्यवाही करावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
बैठकीत वाहतूक पोलिस, शहर पोलिस व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मुख्य संपादक

संदीप राचर्लावार, मुख्य संपादक विदर्भ न्यूज 24 नेटवर्क

शेअर करा.

मुख्य संपादक

संदीप राचर्लावार, मुख्य संपादक विदर्भ न्यूज 24 नेटवर्क

Related Articles

Back to top button
Don`t copy text!