लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने “रन फॉर युनिटी – मॅरेथॉन”चे भव्य आयोजन ✨

गडचिरोली, दि. 31 ऑक्टोबर (विदर्भ न्यूज 24)
भारतीय एकतेचे शिल्पकार आणि लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने आज “रन फॉर युनिटी – मॅरेथॉन”चे भव्य आयोजन करण्यात आले. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस मुख्यालय, उपमुख्यालय प्राणहिता तसेच जिल्ह्यातील सर्व पोस्टे, उपपोस्टे आणि पोमके येथे एकाच वेळी ही मॅरेथॉन पार पडली.
सकाळी 6 वाजता पोलीस कवायत मैदान गडचिरोली येथून या मॅरेथॉनला श्री. नीलोत्पल यांनी हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली. या वेळी अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री. सत्य साई कार्तिक, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज जी., पोलीस उपअधीक्षक (अभियान) श्री. विशाल नागरगोजे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुरज जगताप यांच्यासह जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, युवक-युवती आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
या मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांनी “एक भारत – श्रेष्ठ भारत”चा संदेश देणारे फलक, झेंडे आणि बॅनर हातात घेऊन देशभक्तीच्या जयघोषात दौड पूर्ण केली. मॅरेथॉनचा समारोप शहीद पांडु आलाम सभागृह येथे करण्यात आला.
स्पर्धेत प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या विजेत्यांना अनुक्रमे ₹5000, ₹3000 आणि ₹2000 चे रोख पारितोषिक व प्रमाणपत्र पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. याशिवाय सर्व सहभागी व वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही गौरविण्यात आले.
आपल्या मार्गदर्शनपर भाषणात श्री. नीलोत्पल म्हणाले, “या मॅरेथॉनचा हेतू फक्त धावणे नाही, तर एकतेचा संदेश जनमानसात पोहोचवणे आहे. गडचिरोली जिल्ह्यातील युवक आता सशक्त भारताच्या निर्मितीत हातभार लावत आहेत. ही एकता गडचिरोलीच्या विकासाचा पाया ठरेल.”
कार्यक्रमानंतर सर्व सहभागींसाठी अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले. याच दिवशी एकता दिनानिमित्त पोलीस अधीक्षक कार्यालयात वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत “राष्ट्रीय एकता शपथ” देण्यात आली.
एकता दिनाचे औचित्य साधून सर्व पोस्टे, उपपोस्टे आणि पोमके स्तरावर निबंध स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले. जिल्हाभरातून एकूण 10,540 स्पर्धकांनी मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदविला, ही गडचिरोली पोलीस दलासाठी अभिमानाची बाब ठरली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नागरी कृती शाखेचे पोउपनि. चंद्रकांत शेळके तसेच सर्व शाखांचे अधिकारी व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले



