आसरअल्ली वनपरिक्षेत्राची मोठी कारवाई – एकाच दिवशी २.२७ लाखांचा सागवान जप्त, तीन तस्करांना अटक, बोलेरो वाहनही जप्त

सिरोंचा, विशेष प्रतिनिधी दिनांक:-08ऑगस्ट 2025
गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा वनविभागाच्या आसरअल्ली वनपरिक्षेत्रातील वनकर्मचाऱ्यांनी अवैध सागवान तस्करीविरोधात मोठी मोहीम राबवत एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये एकूण ₹२.२७ लाख किमतीचा सागवान जप्त करून तीन आरोपींना अटक केली आहे. यामध्ये ₹४ लाख किमतीचे बोलेरो वाहनही जप्त करण्यात आले आहे.
—पहिली कारवाई – बोलेरो वाहनातून सागवान जप्त
गुप्त माहितीच्या आधारे ६ ऑगस्ट रोजी पहाटे ४ वाजताच्या सुमारास आसरअल्ली–पातागुडम रोडवर सापळा रचण्यात आला. कोपेला–सोगनपल्ली जंगलातून साग वृक्षांची तोड करून तेलंगाना राज्यात अवैधरित्या वाहतूक केली जाणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
या दरम्यान तेलंगाना नंबर प्लेट असलेले बोलेरो वाहन (क्र. AP-24/AB-9556) दिसताच अडविण्याचा प्रयत्न केला असता चालकाने वेग वाढवून पळ काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, वनकर्मचाऱ्यांच्या सतर्कतेने वाहन थांबवण्यात यश आले. तपासणीत वाहनात ८ साग लठ्ठे (किंमत ₹१.०३ लाख) आढळले. बोलेरो वाहनाची किंमत ₹४ लाख असून, चालक नागे राजकुमार अर्जन्ना सुदुला (रा. सोमनपल्ली) याला त्वरित अटक करून भारतीय वन अधिनियम, १९२७ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला.
—-दुसरी कारवाई – अंकिसा नियतक्षेत्रातील जंगलातून सागवान जप्त
त्याच दिवशी दुसऱ्या कारवाईत अंकिसा नियतक्षेत्रातील कक्ष क्रमांक २७४ मध्ये साग वृक्षांची अवैधरित्या कत्तल करून तयार केलेले ८ साग लठ्ठे साठवून ठेवले असल्याची माहिती मिळाली. वनकर्मचाऱ्यांनी तातडीने धाड टाकून माल जप्त केला. मालाची एकूण किंमत ₹१.२४ लाख असून, तो ट्रॅक्टरद्वारे वनपरिक्षेत्र कार्यालयात आणण्यात आला.
परिसरात शोधमोहीम राबवून दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत प्रसाद रामचंद्र तोरेम आणि राममुर्ती शंकर मोर्ला (रा. गोल्लागुडम, चेक) यांनी हा सागवान तेलंगानात विक्रीसाठी नेण्याचा हेतू असल्याचे कबूल केले. त्यांनाही अटक करून संबंधित कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला.
—अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन व पथकाचे परिश्रम
ही कारवाई मा. एस. नवकिशोर रेड्डी, IFS, उपवनसंरक्षक, सिरोंचा वनविभाग आणि मा. अक्षय मिना, IFS, उपविभागीय वन अधिकारी, सिरोंचा यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. मोहिमेचे नेतृत्व श्री. आर. डी. तोकला, वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रा.), आसरअल्ली यांनी केले. यामध्ये श्री. व्ही. आर. गोल्लेवार (क्षेत्र सहाय्यक), श्री. बी. के. पाडदे, श्री. ए. जी. दोनाडकर, श्री. आर. व्ही. साळवे, श्री. डी. पी. गोटा (वनरक्षक) यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
—उपवनसंरक्षकांचा संदेशमा
. एस. नवकिशोर रेड्डी यांनी सांगितले की,
“वनसंपदेचे संरक्षण हे आमचे पहिले कर्तव्य आहे. सागवान तस्करी रोखण्यासाठी आमचा विभाग सदैव कटिबद्ध असून, अशा कारवाया पुढेही सुरू राहतील. या यशस्वी मोहिमेसाठी मी संपूर्ण पथकाचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.”
––या कारवाईमुळे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे की, आसरअल्ली वनपरिक्षेत्रातील पथक हे वनतस्करांच्या दुष्टचक्राला आळा घालण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे आणि आवश्यकतेनुसार जलद व कडक पावले उचलण्यास सक्षम आहे.