कढोली ते दुबई : संघर्षातून सुवर्णापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास
कढोली ते दुबई : श्वेताने घडवला सुवर्ण इतिहास! एशियन दुबई पॅरा गेम्समध्ये सुवर्ण–कांस्य पदक जिंकणाऱ्या कु. श्वेता भास्कर कोवेचे गडचिरोलीत जंगी स्वागत....

गडचिरोली (आष्टि/चामोर्शी) प्रतिनिधी दिनांक:–18/12/2025
गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम आदिवासी भागातील कढोली (चामोर्शी) गावाची कन्या कु. श्वेता भास्कर कोवे हिने दुबई येथे पार पडलेल्या एशियन पॅरा गेम्समध्ये तिरंदाजी स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करत भारताचे, महाराष्ट्राचे आणि गडचिरोली जिल्ह्याचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्वल केले आहे. वैयक्तिक गटात सुवर्णपदक आणि सांघिक गटात कांस्यपदक पटकावत श्वेताने केवळ विजय मिळवला नाही, तर दिव्यांगत्वावर मात करून जिद्द, चिकाटी आणि परिश्रमाच्या जोरावर इतिहास घडवून दाखवला आहे.
कढोलीसारख्या आदिवासी गावातून थेट आंतरराष्ट्रीय व्यासपीठापर्यंतचा हा प्रवास अत्यंत खडतर होता. अपुरी साधने, मर्यादित संसाधने आणि शारीरिक अडचणी असूनही श्वेताने हार मानली नाही. “जो लोग पाणी से नहाते है वो तसविर बदलते है, मगर जो लोग पसीने से नहाते है वो तकदीर और इतिहास बदलते है” हे वाक्य तिच्या जीवनप्रवासाला तंतोतंत लागू पडते. घाम गाळून मिळवलेले हे यश आज संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यासाठी अभिमानास्पद ठरत आहे.
या नेत्रदीपक यशाबद्दल भारतीय जनता पार्टी, गडचिरोली तर्फे कु. श्वेता भास्कर कोवे हिचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन करण्यात आले. यावेळी भाजपा गडचिरोलीचे जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम यांनी श्वेताच्या कार्याचा गौरव करत सांगितले की, श्वेताने एशियन दुबई पॅरा गेम्समध्ये सुवर्णपदक मिळवून केवळ पदकच नाही, तर आदिवासी समाजातील असंख्य मुलींसाठी नवा आत्मविश्वास निर्माण केला आहे. तिचे यश हे संघर्ष, शिस्त आणि कठोर परिश्रमाचे जिवंत उदाहरण असून, येणाऱ्या पिढीसाठी प्रेरणास्थान आहे.
श्वेताच्या या यशामुळे गडचिरोली जिल्ह्याची ओळख आता केवळ दुर्गम जिल्हा म्हणून न राहता, आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा क्षेत्रात चमकणाऱ्या प्रतिभेचा जिल्हा म्हणून होत आहे. तिच्या स्वागत आणि अभिनंदनाच्या निमित्ताने सर्वत्र आनंदाचे वातावरण असून, भविष्यातही ती देशासाठी असेच सुवर्ण क्षण निर्माण करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
विदर्भ न्यूज 24 – निस्पक्ष, निर्भीड, रोखठोक पत्रकारिता



