# एशियन युथ पॅरा गेम्समध्ये गडचिरोलीच्या श्वेता कोवेची सुवर्ण झळाळी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन – VIDARBHANEWS 24
आपला जिल्हा

एशियन युथ पॅरा गेम्समध्ये गडचिरोलीच्या श्वेता कोवेची सुवर्ण झळाळी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन

भारतासाठी दोन पदके; जिल्हा प्रशासनाकडून सन्मान

गडचिरोली विशेष प्रतिनिधी दिनांक:–18 डिसेंबर 2025

दुबई येथे दि. 8 ते 12 डिसेंबर 2025 दरम्यान झालेल्या एशियन युथ पॅरा गेम्स या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत गडचिरोली जिल्ह्यातील आष्टी येथील कु. श्वेता मंजु भास्कर कोवे हिने पॅरा आर्चरी (कंपाऊंड राऊंड) प्रकारात वैयक्तिक सुवर्णपदक आणि सांघिक कांस्यपदक पटकावत भारतासह गडचिरोली जिल्ह्याचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल केले आहे. तिच्या या घवघवीत यशामुळे जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात अभिमानाची भर पडली आहे.

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा व जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे यांच्या हस्ते जिल्हा प्रशासन व क्रीडा विभागाच्या वतीने श्वेता कोवे हिचा सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी पंडा यांनी, “आंतरराष्ट्रीय स्तरावर श्वेताने केलेली कामगिरी अत्यंत गौरवास्पद असून ती गडचिरोलीतील खेळाडूंना प्रेरणादायी आहे,” असे नमूद करून तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, श्वेताच्या या यशाबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘एक्स’ (ट्विटर) या समाजमाध्यमावरून अभिनंदन करत तिच्या जिद्दीला, परिश्रमांना आणि आत्मविश्वासाला सलाम केला. दुर्गम भागातून आलेल्या तरुणीने आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर सुवर्ण व कांस्य पदके जिंकणे हे संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यासह राज्यासाठी अभिमानास्पद असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

श्वेता कोवे ही खेलो इंडिया आर्चरी प्रशिक्षण केंद्र, आष्टी (ता. चामोर्शी) येथील महात्मा ज्योतीबा फुले कनिष्ठ महाविद्यालयात बी.ए. प्रथम वर्षात शिक्षण घेत असून ती वर्ग आठवीपासून धनुर्विद्येचा नियमित सराव करत आहे. सध्या तिचा सराव खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्रात सुरू असून प्रा. डॉ. श्याम कोरडे यांच्या मार्गदर्शनाखाली तिला तांत्रिक प्रशिक्षण दिले जात आहे.

वडिलांच्या निधनानंतर आईने मोलमजुरी करून कुटुंबाची जबाबदारी सांभाळत श्वेताला सातत्याने प्रोत्साहन दिले. आईच्या पाठबळावर आणि स्वतःच्या अथक मेहनतीवर विश्वास ठेवत श्वेताने जीवनातील अनेक अडचणींवर मात केली. एशियन युथ पॅरा गेम्समध्ये तब्बल १४ देशांच्या खेळाडूंशी स्पर्धा करत तिने ही कामगिरी साध्य केली.

भविष्यात ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या श्वेता कोवेच्या या यशामुळे दुर्गम व आदिवासी भागातील असंख्य मुला-मुलींना नवी दिशा, आशा आणि आत्मविश्वास मिळाला असून तिची ही कामगिरी युवा पिढीसाठी प्रेरणास्थान ठरत आहे.


विदर्भ न्यूज 24 | निर्भीड • निष्पक्ष • जनआवाजासाठी पत्रकारिता

मुख्य संपादक

संदीप राचर्लावार, मुख्य संपादक विदर्भ न्यूज 24 नेटवर्क

शेअर करा.

मुख्य संपादक

संदीप राचर्लावार, मुख्य संपादक विदर्भ न्यूज 24 नेटवर्क

Related Articles

Back to top button
Don`t copy text!