गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी दिनांक :-21 एप्रिल 2025 राज्य शासनाच्या राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा २०२४-२५ अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात राबवण्यात आलेल्या नवोन्मेषी प्रशासनिक उपक्रमांना राज्यस्तरावर मान्यता मिळाली असून, यासाठी जिल्ह्यातील दोन अधिकाऱ्यांना गौरविण्यात आले आहे. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांना ग्रामसभा सक्षमीकरण उपक्रमासाठी विभागीय स्तरावर तृतीय क्रमांकाचा पुरस्कार देण्यात आला, तर कुरखेडा तहसिल कार्यालयाचे नायब तहसिलदार निखील पाटील यांना ‘एकच ॲप – सर्व सेवा’ या अभिनव उपक्रमासाठी द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
मुंबई येथील सह्याद्री राज्य अतिथीगृहात आयोजित भव्य कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दोन्ही पुरस्कार वितरित करण्यात आले. या वेळी कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, राज्याचे मुख्य सचिव सुजाता सौनिक, इतर वरिष्ठ अधिकारी आणि विविध जिल्ह्यांतील प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
लोकसहभागातून ग्रामसभा सक्षमीकरणाचे कार्य
जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोलीतर्फे ‘सामूहिक वनहक्क प्राप्त ग्रामसभा सक्षमीकरण’ हा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील आदिवासी भागातील ग्रामसभांना अधिकारांची जाणीव करून देणे, स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याची क्षमता वाढवणे आणि सामूहिक जबाबदारीचे भान निर्माण करणे हे उद्दिष्ट होते. वनहक्क कायद्यान्वये प्राप्त हक्कांचा योग्य उपयोग करून घेण्यासाठी ग्रामसभा सक्षम करणे, निर्णय प्रक्रियेत त्यांचा सक्रिय सहभाग वाढवणे आणि विकास प्रक्रियेत त्यांचे योगदान वाढवण्याचे काम जिल्हा प्रशासनाने या उपक्रमांतून केले.
हा उपक्रम राज्य शासनाच्या प्रशासकीय गतिमानता अभियानात विभागीय स्तरावर तृतीय क्रमांकासाठी निवडण्यात आला असून, त्यासाठी जिल्हाधिकारी पंडा यांना रु. ४ लाख रोख पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा उपक्रम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सक्षमीकरणाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल ठरला आहे.
डिजिटायझेशनच्या दिशेने एक पुढचे पाऊल – ‘एकच ॲप, सर्व सेवा’
दुसरीकडे, कुरखेडा तहसिल कार्यालयाचे नायब तहसिलदार निखील पाटील यांनी विकसित केलेला ‘एकच ॲप – सर्व सेवा’ हा उपक्रम लोकसेवा सुलभतेसाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे. या ॲपच्या माध्यमातून तहसिल कार्यालयाशी संबंधित विविध सेवा – उत्पन्न, रहिवासी, जात प्रमाणपत्र, जमीन संबंधित नोंदी आदी – नागरिकांना एका क्लिकवर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
या ॲपमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना वेळ व पैशाची बचत होण्यासह कार्यालयात होणाऱ्या गर्दीमध्येही मोठी घट झाली आहे. या नवकल्पनासाठी नायब तहसिलदार निखील पाटील यांना शासकीय अधिकाऱ्यांच्या गटात ‘सर्वोत्तम कल्पना व उपक्रम’ श्रेणीत द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार देण्यात आला असून त्याचे रोख स्वरूप रु. ३०,००० आहे.
चांगल्या प्रशासनासाठी स्पर्धात्मकता
राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानाच्या माध्यमातून राज्य शासनाने प्रशासनात नवकल्पना, पारदर्शकता, कार्यक्षम निर्णयप्रक्रिया आणि लोकाभिमुखता वाढवण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे. या अभियानांतर्गत राज्यातील प्रत्येक विभाग आणि जिल्ह्यातून सादर करण्यात आलेल्या उपक्रमांची स्वतंत्र समितीमार्फत छाननी करण्यात आली. गुणवत्तेच्या आधारे गुणवंत उपक्रमांची निवड करून त्यांना विविध स्तरांवर गौरविण्यात आले.
सह्याद्री अतिथीगृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात २०२३-२४ आणि २०२४-२५ या दोन आर्थिक वर्षांतील निवडक उपक्रमांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. उपस्थित अधिकाऱ्यांनी विजेत्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन करून, त्यांचे कार्य अन्य जिल्ह्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले.
विदर्भ न्यूज-24 नेटवर्क