सिरोंचा ता. सिरोंचा दिनांक 21 एप्रिल 2025 तालुक्यातील शासकीय अनुसूचित जाती नवबौध्द निवासी शाळेतील विद्यार्थिनींच्या शासकीय लाभांमध्ये गंभीर अनियमितता आणि आर्थिक शोषण झाल्याचा प्रकार उघड झाला आहे. शासनाच्या आदेशानुसार विद्यार्थिनींच्या खात्यात ‘डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर’ (DBT) प्रणालीद्वारे गणवेशासाठी ३०८२/- रुपये जमा करण्यात आले होते. मात्र, शाळेचे मुख्याध्यापक बोरवार यांनी विद्यार्थिनींकडून परस्पर ही रक्कम वसूल केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
सामाजिक न्याय विभागाच्या आदेशानुसार शासकीय वस्तीगृह व निवासी शाळांमधील लाभार्थ्यांना वस्तू न देता थेट त्यांच्या खात्यात निधी जमा केला जातो. मात्र, याच आदेशाचा भंग करत मुख्याध्यापकांनी शासन निर्णयाची अंमलबजावणी न करता विद्यार्थिनींचे आर्थिक शोषण केले आहे. या प्रकारामुळे अनेक गरजू विद्यार्थिनींवर अन्याय झाला असून त्यांच्या शैक्षणिक व मानसिक स्थितीवर परिणाम झाल्याचे पालक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितले.
या प्रकाराबाबत दिनांक ३ एप्रिल रोजी तहसील कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले होते. निवेदनात या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. त्याचबरोबर विद्यार्थिनींना त्यांच्या खात्यातील मूळ रक्कम परत मिळवून द्यावी, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, पंधरा दिवस उलटूनही प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही न झाल्याने विद्यार्थिनींच्या हक्कासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने पुढाकार घेत तहसील कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे.
हे आंदोलन तालुका अध्यक्ष सागर मूलकला, जिल्हा पदाधिकारी चोक्कामवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू असून, जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलनाला चालना मिळाली आहे. या उपोषण स्थळी पक्षाच्या नेत्या भाग्यश्री आत्राम यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून तहसीलदारांना घटनास्थळी बोलावले व तातडीने चौकशी करून संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी केली.
या आंदोलनामुळे प्रशासनावर दबाव वाढला असून, लवकरच चौकशीला गती मिळेल अशी शक्यता आहे. विद्यार्थिनींच्या हक्कांसाठी सुरू असलेले हे आंदोलन अधिक व्यापक रूप धारण करू शकते, असे संकेत मिळत आहेत.