गडचिरोली विदर्भ न्यूज 24 नेटवर्क दिनांक:-17/05/2025 गोंडवाना विद्यापीठातील कार्यरत निवड श्रेणी लिपिक कु. सोनालीताई भास्करवार यांचे दिनांक 25 एप्रिल 2025 रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे निधन झाले.
स्वभावाने अतिशय सुंदर व कर्तव्यनिष्ठ कर्मचाऱ्याच्या अचानक जाण्याने विद्यापीठ परिवारात दुःखाचे वातावरण पसरले होते. गोंडवाना विद्यापीठातील कर्मचारी संघटना ही नेहेमीच आपल्या सदस्यांच्या हित राखण्यासोबतच सामाजिक दायित्व म्हणून निरनिराळे सामाजिक उपक्रम राबवित असते. याचाच भाग म्हणून मृत कर्मचाऱ्याच्या शोकाकुल परिवाराकरिता अर्थसहाय्य करण्याबाबत संघटनेच्या वतीने आवाहन करण्यात आलेले होते.
संघटनेच्या आवाहनास प्राध्यापक, अधिकारी व कर्मचारी यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत सामाजिक बांधिलकी जोपासली व स्वेच्छेने आर्थिक सहाय्य केले.
सदर जमा झालेली अर्थसहाय्याची रक्कम मृत कर्मचारी सोनालीताई भास्करवार यांचे पती श्री. सतिश बिरेवार यांच्या सुपूर्द करण्यात आली. सोबतच संघटनेच्या वतीने सोनालीताईंची स्मृती म्हणून त्यांची प्रतिमा भेट देण्यात आली.
यावेळी संघटनेचे सचिव सतिश पडोळे यांनी शासकीय व प्रशासकीय नियमानुसार देय असलेले सर्व लाभ सोनालीताईंच्या परिवारास मिळवून देण्यासाठी संघटना कटिबद्ध असेल असा विश्वास संघटनेच्या वतीने देण्यात आला.
तसेच सोनालीताईंच्या स्वभाव गुणांचे वर्णन करतांना ते शांत, संयमी, दयाळू व्यक्तिमत्वाचे, कर्तव्यनिष्ठ कर्मचारी होते. प्रत्येकांना आपुलकी वाटेल असे त्यांचे स्वभाव गुण होते. असे म्हणाले. म्हणूनच त्यांच्या अंत्यविधीला देखील दूरपासूनची उपस्थिती होती. आणि नुसत्या व्हाट्सअप वरून केलेल्या आवाहनाला लोकांनी स्वेच्छेने प्रतिसाद देत अर्थसहाय्य केले. यामध्ये महासंघ, विद्यापीठ, महाविद्यालयांतील प्राध्यापक, अधिकारी व कर्मचारी यांचा सहभाग असल्याची माहिती दिली.
मिळालेला मोठा प्रतिसाद हेच त्यांच्या स्वभाव गुणांची पावती आहे. असेही म्हणाले.
उदार मनाने अर्थसहाय्य करणाऱ्या सर्व मान्यवरांचे संघटनेच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
याप्रसंगी मृत सोनाली भास्करवार यांचे पती श्री. सतिश बिरेवार, संघटनेचे अध्यक्ष मनोज जाधव, उपाध्यक्ष महादेव वासेकर, सचिव सतिश पडोळे, सहसचिव शाहिना पठाण, कोषपाल प्रवीण बुराडे, कार्यकारी मंडळाचे सदस्य रामकृष्ण बोरकर, अविनाश सिडाम व मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते.