गडचिरोली विशेष प्रतिनिधी दिनांक:-14/06/2025 गडचिरोली पोलिस दलामार्फत ‘पोलीस दादालोरा खिडकी’ व ‘प्रोजेक्ट उडान’ या सामाजिक उपक्रमांतर्गत जागतिक रक्तदाता दिनाचे औचित्य साधून एकाच दिवशी जिल्ह्यात तीन ठिकाणी भव्य रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात एकूण 330 जणांनी रक्तदान केले असून, विशेष म्हणजे पहिल्यांदाच आत्मसमर्पित माओवादी सदस्यांनी देखील उत्स्फूर्त सहभाग नोंदवून सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव दाखवली.
या उपक्रमात जिल्हा सामान्य रुग्णालय रक्तकेंद्र, गडचिरोली व उपजिल्हा रुग्णालय, अहेरी यांच्या सहकार्याने गडचिरोली पोलीस मुख्यालय, उपमुख्यालय प्राणहिता आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, सिरोंचा येथे रक्तदान शिबिरे पार पडली. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी वरिष्ठ पोलीस अधिकारी, वैद्यकीय अधिकारी व स्थानिक पोलीस आणि नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गडचिरोली पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांनी या वेळी बोलताना सांगितले की, “गेल्या वर्षभरात गडचिरोली पोलिस दलामार्फत विविध रक्तदान शिबिरांमध्ये जवळपास 2800 युनिट रक्तदान करण्यात आले आहे. समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो, ही भावना अंगीकारून सर्वांनी किमान तीन महिन्यांतून एकदा रक्तदान करावे.”
शिबिरात रक्तदात्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले. या प्रसंगी अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. सत्य साई कार्तिक, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधुरी किलनाके, पोलीस उपअधीक्षक अभियान श्री. विशाल नागरगोजे, उपविभागीय पोलीस अधिकारी गडचिरोली श्री. सुरज जगताप, मुख्य वैद्यकीय अधिकारी पोलीस रुग्णालय श्री. सुनिल मडावी आदी मान्यवर उपस्थित होते.
प्राणहिता येथे झालेल्या शिबिरात अहेरी, भामरागड, एटापल्ली, हेडरी आदी तालुक्यांतील पोलीस व नागरीकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. उद्घाटनप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी अहेरी श्री. अजय कोकाटे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन धोटे, पोनि. हर्षल एकरे आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
सिरोंच्यातील शिबिरात देखील सिरोंचा, जिमलगट्टा, असरअली, पातागुडम आदी भागांतील अधिकारी व नागरिकांनी सहभाग नोंदवला. या ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. संदेश नाईक, वैद्यकीय अधीक्षक डॉ. चेतना वरठी, डॉ. करिष्मा नान्ने, डॉ. आदित्य सपकाळ यांच्यासह पोनि. समाधान चव्हाण उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जनसंपर्क शाखा, पोलीस कल्याण शाखा, नागरी कृती शाखा, तसेच गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयाची टीम यांनी विशेष परिश्रम घेतले.
गडचिरोली पोलीस दलाचा हा उपक्रम सामाजिक सहभागासाठी एक आदर्श ठरत असून, “रक्तदान हेच श्रेष्ठदान” या संदेशाचा प्रभावही व्यापक प्रमाणावर दिसून येत आहे.