अंकिसा परिसरातील रेती माफियांचा धुमाकूळ – महामार्गावर नागरिकांचे जीवन धोक्यात

सिरोंचा विदर्भ न्यूज 24 प्रतिनिधी दिनांक:29/09/2025
जिल्ह्यातील अंकीसा परिसरात रेती माफियांचा मनमानी कारभार दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांच्या सुरक्षेला थेट धोका निर्माण झाला आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 63 वरच मोठ्या प्रमाणात रेतीची लोडिंग चालू असून डंपिंग यार्डमधून थेट हायवेवर उभ्या ट्रकांना जेसीबीद्वारे रेती भरली जात आहे. यामुळे महामार्गावर वाहतूक ठप्प होऊन अपघाताचा गंभीर धोका कायम आहे.
नागरिकांच्या मुख्य तक्रारी
आम जनतेच्या वाहतुकीत अडथळा : हायवेवर थेट रेती लोडिंग केल्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहनचालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
अपघाताची भीती : महामार्गावर खड्ड्यांची संख्या वाढली असून वारंवार रेतीचे ओझे पडल्याने रस्ता अधिकच धोकादायक बनला आहे.
अनधिकृत साठा : रेती माफियांनी शासन परवानगीपेक्षा अधिक ब्रास रेतीचा साठा करून ठेवला असून त्याची विक्री खुलेआम सुरू आहे.
प्रशासनाची मौन भूमिका : स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की, प्रशासनाकडून यावर अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.
तालुक्यातील सर्वच क्वारी मालकांची मनमानी
सदर परिस्थिती केवळ अंकीसा पुरती मर्यादित नसून तालुक्यातील जवळपास सर्वच रेती क्वारी मालक मनमानी कारभार करीत आहेत. परवानगीपेक्षा जास्त उत्खनन, अनधिकृत साठा, महामार्गावर धोकादायक पद्धतीने रेती वाहतूक ही नेहमीची बाब झाली आहे.
नागरिकांचा इशारा
स्थानिक नागरिक आणि समाजसेवकांनी प्रशासनास इशारा दिला आहे की,
जर तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई झाली नाही,
तर लोकशाही मार्गाने मोठ्या आंदोलनाला प्रारंभ करण्यात येईल.
जनतेच्या जिवाशी थेट खेळ
रेती माफियांचा हा उघड उघड कारभार केवळ सरकारी नियमांचे उल्लंघन नसून सामान्य लोकांच्या जिवाशी थेट खेळ असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. गडचिरोली जिल्ह्यातील ही गंभीर समस्या लक्षात घेता प्रशासनाने त्वरित कठोर उपाययोजना करणे गरजेचे आहे.
विदर्भ न्यूज 24 या माध्यमातून जिल्हा प्रशासनास मागणी करण्यात येत आहे की, या सर्व बेकायदेशीर रेती कारभाराला तातडीने आळा घालून दोषींवर गुन्हे दाखल करण्यात यावेत.