अंमली पदार्थ तस्करीवर गडचिरोली पोलिसांचा करारी घाव; १५ लाखांहून अधिक किमतीचा गांजा जप्त

गडचिरोली प्रतिनिधी विदर्भ न्यूज24 दिनांक:-07 जानेवारी 2026
अंमली पदार्थ तस्करीवर गडचिरोली पोलिसांचा करारी घाव; १५ लाखांहून अधिक किमतीचा गांजा जप्त भाग म्हणून स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत गांजाची लागवड करून विक्रीच्या तयारीत असलेल्या एका आरोपीस ताब्यात घेतले आहे. या कारवाईत तब्बल १५ लाख १९ हजार ७५० रुपये किमतीचा अंमली पदार्थ व साहित्य जप्त करण्यात आले असून, ही कारवाई जिल्ह्यातील अंमली पदार्थविरोधी मोहिमेतील महत्त्वाची यशस्वी कामगिरी ठरली आहे.
पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन, उपपोस्टे व पोमकेंना अंमली पदार्थ तस्करीसह सर्व अवैध कारवायांवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर दिनांक 05 जानेवारी 2026 रोजी उपविभाग कुरखेडा अंतर्गत येणाऱ्या पोलीस स्टेशन कोरची हद्दीतील मौजा हितकसा येथे स्थानिक गुन्हे शाखेने अंमली पदार्थविरोधी धडक कारवाई केली.
स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, मौजा हितकसा येथील पुनाराम अलिसाय मडावी (वय 45, रा. हितकसा, ता. कोरची, जि. गडचिरोली) हा इसम स्वतःच्या राहत्या घराच्या सांदवाडीत अवैधरित्या गांजाची लागवड करत असून, त्याची विक्री करण्याच्या तयारीत आहे. मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तात्काळ घटनास्थळी रवाना झाले.
आरोपीच्या घरी पोहोचून सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत पंचासमक्ष झडती घेण्यात आली. झडतीदरम्यान आरोपीच्या घराच्या सांदवाडीत गांजाची मोठ्या प्रमाणात लागवड आढळून आली. तपासणीमध्ये लहान-मोठी अशी एकूण 160 गांजाची झाडे सापडली. या झाडांमध्ये गर्द हिरव्या रंगाची पाने, फुले व बोंडे असलेली ओली झाडे तसेच अर्धवट वाळलेला गांजा आढळून आला.
पंचासमक्ष मोजणी व वजन केल्यानंतर कॅनबिस वनस्पती स्वरूपातील अंमली पदार्थ गांजा एकूण 30.375 किलो वजनाचा असल्याचे निष्पन्न झाले. प्रति किलो 50 हजार रुपये या प्रमाणे या गांजाची किंमत 15 लाख 18 हजार 750 रुपये इतकी ठरवण्यात आली. याशिवाय आरोपीकडून 1 हजार रुपये किमतीचा इलेक्ट्रिक काटा देखील जप्त करण्यात आला. अशा प्रकारे एकूण 15 लाख 19 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.
आरोपीने विक्रीच्या उद्देशाने स्वतःच्या घराच्या सांदवाडीत गांजाची लागवड केल्याचे स्पष्ट झाल्याने त्याच्याविरोधात पोलीस स्टेशन कोरची येथे दिनांक 05 जानेवारी 2026 रोजी गुन्हा क्रमांक 02/2026 अंतर्गत एनडीपीएस कायदा 1985 मधील कलम 8(क), 20(अ), 20(ब)(ii), 20(क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस स्टेशन कोरचीचे पोलीस उपनिरीक्षक मुकुंदा देशमुख हे करीत आहेत.
ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज जी. यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. अरुण फेगडे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान दौंड, पोलीस अंमलदार रोहित गोंगले, प्रशांत गरफडे, शिवप्रसाद करमे तसेच चापोअं. रामदास उईनवार यांनी ही यशस्वी कारवाई केली.
गडचिरोली जिल्ह्यात अंमली पदार्थ तस्करीविरोधात पोलीस प्रशासन शून्य सहनशीलतेच्या भूमिकेत असून, अशा कारवायांमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. पोलीसांचा हा करारी ‘नो ड्रग्स’ संदेश स्पष्ट असून, भविष्यातही अशाच कठोर कारवाया सुरू राहणार असल्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.



