अमली पदार्थविरोधी जनजागृती रॅली सिरोंच्यात उत्साहात पार — 350 हून अधिक विद्यार्थी व नागरिकांचा सहभाग
350 हून अधिक विद्यार्थी व नागरिकांचा सहभाग

सिरोंचा विदर्भ न्यूज 24 नेटवर्क दिनांक 2 ऑक्टोंबर 2025
स्वातंत्र्यदिनाच्या पावन दिवशी देशभक्तीबरोबरच सामाजिक जबाबदारीची जाणीव जागवणारा उपक्रम सिरोंच्यात पाहायला मिळाला. गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या अमली पदार्थविरोधी जनजागृती मोहिमेअंतर्गत, सिरोंचा पोलीस स्टेशनच्या पुढाकाराने 15 ऑगस्ट रोजी सकाळी 8 ते 9 या वेळेत भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले.
ही रॅली मा. निलोत्पल, पोलीस अधीक्षक, गडचिरोली यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच मा. एम. रमेश (अप्पर पोलीस अधीक्षक – अभियान), मा. गोकुलराज (अप्पर पोलीस अधीक्षक – प्रशासन), मा. सत्यसाई कार्तिक (अप्पर पोलीस अधीक्षक – अहेरी), आणि मा. अजय कोकाटे (उपविभागीय पोलीस अधिकारी – सिरोंचा) यांच्या देखरेखीखाली पार पडली. आयोजनाची जबाबदारी पोलीस निरीक्षक मा. निखिल फटिंग यांनी स्वतः सांभाळली.
रॅलीचा मार्ग आणि उद्देश
जिल्हा परिषद हायस्कूल, सिरोंचा येथे विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीची शपथ देऊन रॅलीला सुरुवात झाली. त्यानंतर ग्रामीण रुग्णालय, बसस्टॉप चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे जयस्तंभ मैदान येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. हातात फलक व घोषवाक्ये घेऊन विद्यार्थ्यांनी “तंबाखू, गुटखा, खर्रा, दारू, गांजा व इतर सर्व नशापदार्थांपासून दूर राहा” असा ठाम संदेश दिला.
नागरिकांमध्ये जनजागृती
रॅलीदरम्यान नागरिकांना अमली पदार्थांच्या सेवनाचे दुष्परिणाम, कायदेशीर शिक्षा, तसेच आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम याची सविस्तर माहिती देण्यात आली. वाटेत जागोजागी थांबून माहितीपत्रकांचे वाटप करून जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यात आली.
मोठ्या संख्येने सहभाग
या रॅलीत 350 ते 400 विद्यार्थी, पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचारी, शिक्षक, ग्रामस्थ आणि विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते उत्साहाने सहभागी झाले. रॅली यशस्वी करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक मारोती नंदे, प्रवीण सोनवणे, नरेंद्र वंगाटे, प्रांजली कुलकर्णी, लावण्या जक्कन, मारोती धरणी, मारा मडावी, सिविक ॲक्शनचे पोलीस शिपाई सुनील राठोड आणि इतर पोलीस स्टाफ यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली.
जनतेस दिलेला संदेश
या उपक्रमातून सिरोंचा शहरवासीयांना एकच संदेश देण्यात आला — “व्यसनमुक्त समाज घडवूया, नशामुक्त भारत घडवूया.”