उपविभाग हेडरी अंतर्गत तुमरकोठी येथे अवघ्या 24 तासांत नवीन पोलीस स्टेशनची उभारणी; अतिदुर्गम भागाच्या सुरक्षेसाठी ऐतिहासिक पाऊल
1000 सी–60 कमांडो, 21 बीडीडीएस टीम, नवनियुक्त पोलीस जवान, 500 विशेष पोलीस अधिकारी व खाजगी कंत्राटदार यांच्या मदतीने 24 तासात उभारले नवीन पोलीस स्टेशन अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती) डॉ. छेरिंग दोरजे, विशेष पोलीस महानिरीक्षक (नविअ) श्री. संदिप पाटील, पोलीस उप-महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र श्री. अंकित गोयल, उप-महानिरीक्षक (अभियान) सीआरपीएफ श्री. अजय कुमार शर्मा, पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. नीलोत्पल, 191 बटा. चे कमांडण्ट श्री. सत्य प्रकाश, इतर वरिष्ठ अधिकारी व ग्रामस्थंाच्या उपस्थितीत पार पडले नवीन पोलीस स्टेशनचे उद्घाटन नवीन पोलीस स्टेशनची स्थापना ही या भागाची सुरक्षा आणि स्थानिक नागरिकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरीता मैलाचा दगड ठरेल … पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सन-2023 पासूनच्या सुरक्षा पोकळी कमी करण्यासाठीच्या साखळीमधील 9 व्या नवीन पोलीस स्टेशनची स्थापना

गडचिरोली विशेष प्रतिनिधी दिनांक:– 19/12/2025
माओवाददृष्ट्या अतिसंवेदनशील आणि दुर्गम-अतिदुर्गम भागांनी वेढलेला गडचिरोली जिल्हा आजही विकास आणि सुरक्षेच्या मोठ्या आव्हानांना सामोरा जात आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांना सुरक्षिततेची भावना देत त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाने एक ठोस आणि निर्णायक पाऊल उचलले आहे. आज दिनांक 19 डिसेंबर 2025 रोजी उपविभाग हेडरी अंतर्गत तुमरकोठी येथे नवीन पोलीस स्टेशनची स्थापना करण्यात आली.
पोलीस स्टेशन कोठीपासून सुमारे 7 किलोमीटर तर छत्तीसगड राज्याच्या सीमेजवळ अवघ्या 2 किलोमीटर अंतरावर असलेले तुमरकोठी हे क्षेत्र दीर्घकाळ माओवाद्यांच्या हालचालींमुळे असुरक्षित मानले जात होते. या भागातील आदिवासी नागरिक आजही मूलभूत सुविधा, रस्ते, वाहतूक आणि शासकीय सेवा यांपासून वंचित होते. नवीन पोलीस स्टेशनच्या स्थापनेमुळे या संपूर्ण परिसराच्या सुरक्षेला बळकटी मिळणार असून विकासाच्या नव्या वाटा खुल्या होणार आहेत.
विशेष बाब म्हणजे या पोलीस स्टेशनची उभारणी अवघ्या 24 तासांत पूर्ण करण्यात आली. या ऐतिहासिक मोहिमेत 1000 सी-60 कमांडो, 21 बीडीडीएस पथके, नवनियुक्त पोलीस जवान, 500 विशेष पोलीस अधिकारी तसेच खाजगी कंत्राटदारांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. एकूण 1050 मनुष्यबळ, 4 जेसीबी, 7 ट्रेलर, 2 पोकलेन, 25 ट्रक आदी अवजड यंत्रसामग्रीच्या सहाय्याने अतिदुर्गम जंगल परिसरात ही उभारणी यशस्वीपणे पार पडली.
या नवीन पोलीस स्टेशनमध्ये पोलीस दलाच्या कार्यक्षमतेसाठी वायफाय सुविधा, 12 पोर्टा केबिन, जनरेटर शेड, पिण्याच्या पाण्यासाठी आरओ प्लांट, मोबाईल टॉवर, टॉयलेट सुविधा, पोस्ट सुरक्षेसाठी मॅक वॉल, बी.पी. मोर्चा तसेच 8 सँड मोर्चांची उभारणी करण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने येथे गडचिरोली पोलीस दलाचे 2 अधिकारी व 52 अंमलदार, एसआरपीएफ ग्रुप-12 हिंगोली ई कंपनीचे 2 प्लाटून, सीआरपीएफ 191 बटालियनच्या एफ कंपनीचे 1 असिस्टंट कमांडंट व 79 अधिकारी-अंमलदार तसेच विशेष अभियान पथकाची 8 पथके म्हणजेच सुमारे 200 कमांडो तैनात करण्यात आले आहेत.
पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल यांनी यावेळी बोलताना सांगितले की, “नवीन पोलीस स्टेशनची स्थापना ही या भागातील सुरक्षा साखळी मजबूत करण्यासोबतच स्थानिक नागरिकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मैलाचा दगड ठरेल.” सन 2023 पासून निर्माण झालेल्या सुरक्षा पोकळी भरून काढण्यासाठी उभारण्यात आलेल्या नव्या पोलीस ठाण्यांच्या साखळीतील हे नववे पोलीस स्टेशन असल्याचेही त्यांनी नमूद केले.
याआधी दिनांक 11 डिसेंबर 2024 रोजी पेनगुंडा येथे पोलीस मदत केंद्र, 30 जानेवारी 2025 रोजी नेलगुंडा येथे पोलीस स्टेशन, 9 मार्च 2025 रोजी कवंडे येथे पोलीस स्टेशन तसेच 23 नोव्हेंबर 2025 रोजी फुलनार कॅम्प गुंडूरवाही येथे पोलीस मदत केंद्राची स्थापना करण्यात आली होती. या सर्व उपक्रमांमुळे अति-दुर्गम भागातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना बळकट झाली आहे.
पोलीस स्टेशनच्या उभारणी कार्यक्रमादरम्यान जनजागरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यामध्ये स्थानिक महिलांना साड्या, चप्पल, पुरुषांना घमेले, ब्लँकेट, स्वयंपाक भांड्यांचे संच, मच्छरदाण्या, युवकांना लोअर पॅन्ट, टी-शर्ट, नोटबुक, पेन, स्कूल बॅग, कंपास, चॉकलेट, बिस्किटे तसेच लहान मुलांना क्रिकेट बॅट, बॉल, स्टंप संच, व्हॉलीबॉल नेट आणि व्हॉलीबॉलचे वितरण करण्यात आले. पोलीस दलाच्या या नागरी कृती उपक्रमांमुळे नागरिकांमध्ये पोलीस प्रशासनाबद्दल आपुलकी आणि विश्वास वाढताना दिसून आला.
वाढलेल्या सुरक्षेमुळे भविष्यात या भागात नवीन रस्ते बांधकाम, एस.टी. बस सेवा सुरू करणे शक्य होणार असून शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या संधींनाही चालना मिळणार आहे. नवीन पोलीस स्टेशनच्या उभारणीमुळे स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त करत पोलीस प्रशासनाचे आभार मानले.
या उद्घाटनप्रसंगी अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती) डॉ. छेरिंग दोरजे, विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) श्री. संदिप पाटील, पोलीस उप-महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र श्री. अंकित गोयल, उप-महानिरीक्षक (अभियान) सीआरपीएफ श्री. अजय कुमार शर्मा, पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल, कमांडंट 191 बटालियन सीआरपीएफ श्री. सत्य प्रकाश, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., उप-कमांडंट सीआरपीएफ श्री. चंचल परवाना, सहाय्यक पोलीस अधीक्षक धानोरा श्री. अनिकेत हिरडे, उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड श्री. अमर मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी हेडरी श्री. योगेश रांजणकर तसेच नवनियुक्त प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक गोरखनाथ सुरासे यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी, पोलीस अंमलदार आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तुमरकोठी येथील हे नवीन पोलीस स्टेशन केवळ एक इमारत नसून, या संपूर्ण दुर्गम परिसराच्या सुरक्षित, स्थिर आणि विकासाभिमुख भविष्यासाठी उभारलेला मजबूत आधारस्तंभ ठरणार आहे.
1000 सी–60 कमांडो, 21 बीडीडीएस टीम, नवनियुक्त पोलीस जवान, 500 विशेष पोलीस अधिकारी व खाजगी कंत्राटदार यांच्या मदतीने 24 तासात उभारले नवीन पोलीस स्टेशन
अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती) डॉ. छेरिंग दोरजे, विशेष पोलीस महानिरीक्षक (नविअ) श्री. संदिप पाटील, पोलीस उप-महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र श्री. अंकित गोयल, उप-महानिरीक्षक (अभियान) सीआरपीएफ श्री. अजय कुमार शर्मा, पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. नीलोत्पल, 191 बटा. चे कमांडण्ट श्री. सत्य प्रकाश, इतर वरिष्ठ अधिकारी व ग्रामस्थंाच्या उपस्थितीत पार पडले नवीन पोलीस स्टेशनचे उद्घाटन
नवीन पोलीस स्टेशनची स्थापना ही या भागाची सुरक्षा आणि स्थानिक नागरिकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरीता मैलाचा दगड ठरेल … पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल
सन-2023 पासूनच्या सुरक्षा पोकळी कमी करण्यासाठीच्या साखळीमधील 9 व्या नवीन पोलीस स्टेशनची स्थापना
……………………………………………………………………………………



