सिरोंचा-आंकिसा परिसर गेल्या दोन दिवसांपासून अंधारातच – प्रशासनच्या यांकडे दुर्लक्ष, नागरिक आक्रोशित…
विदर्भ न्यूज 24 विशेष बातमी...

सिरोंचा विशेष प्रतिनिधी दिनांक,:– 02 सप्टेंबर 2025
गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा–आंकिसा परिसर मागील दोन दिवसांपासून पूर्णपणे अंधारात असून स्थानिक नागरिक संताप व्यक्त करत आहेत. ग्रामीण भागातील नागरिक आधीच असुविधांशी झगडत असताना आता वीजपुरवठ्याच्या वारंवार खंडित होण्यामुळे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.
स्थानिक रहिवाशांचा आरोप आहे की, स्टॅनिक प्रशासनाकडून या गंभीर समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे. पावसाळ्यामुळे तांत्रिक अडचणी वाढल्या असल्या तरी गेल्या दोन दिवसांपासून विजेचा मागमूस नसल्यामुळे शेतकरी, विद्यार्थी, लहान मुले व व्यावसायिक यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
याबाबत नागरिकांची भूमिका स्पष्ट आहे :
> “आज 5G चा जमाना आहे, पण आम्हाला अजूनही 1990 च्या काळात ढकलले आहे. किमान वीजपुरवठ्याची हमी प्रशासनाने द्यावी. अन्यथा सिरोंचा ते आंकिसा दरम्यान ब्रेकडाउनची समस्या 10 दिवसांत सोडवली नाही तर मोठे आंदोलन उभारले जाईल.”
गौरतलब म्हणजे, आलापल्ली–सिरोंचा या मार्गावर तब्बल 80 किमी घनदाट जंगल असूनदेखील वीजपुरवठ्याची अडचण होत नाही. परंतु फक्त सिरोंचा–आंकिसा या 5 किमीच्या जंगल पट्ट्यातच वारंवार ब्रेकडाउन होतो हा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे नागरिकांत संशय निर्माण झाला आहे की, प्रशासनाकडून किंवा वीज वितरण कंपनीकडून या भागाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात आहे काय?
नागरिकांच्या मते,
“उन्हाळ्याच्या दिवसांत ट्री कटिंग करणे अत्यावश्यक असते. त्यासाठी दरवर्षी फंड उपलब्ध केला जातो. परंतु या वर्षीही योग्यवेळी ट्री कटिंग न झाल्याने पावसाळ्यात तारांवर झाडांच्या फांद्या आदळून ब्रेकडाउन वाढले आहेत. त्यामुळे प्रश्न असा उपस्थित होतो की, ट्री कटिंगसाठीचा फंड गेला कुठे?”
यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी तसेच सामान्य नागरिकांनी इशारा दिला आहे की,
“10 दिवसांत समस्या मार्गी लावली नाही तर तीव्र आंदोलन छेडले जाईल.”
या समस्येकडे महावितरण विभाग तसेच गडचिरोली जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने लक्ष घालणे गरजेचे आहे. अन्यथा नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा स्थानिकांनी दिला आहे.