कायदा-सुव्यवस्था सुदृढ करण्यासाठी चातगाव येथे गडचिरोली पोलीस दलाअंतर्गत 35 व्या पोलीस स्टेशनची निर्मिती
गृह विभाग महाराष्ट्र शासन यांच्या दिनांक 28/10/2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये पोलीस स्टेशन चातगाव निर्मितीस मिळाली मान्यता • पोलीस अधीक्षक गडचिरोली, श्री. नीलोत्पल यांचे हस्ते पोलीस स्टेशन चातगावचे उद्घाटन

गडचिरोली विशेष प्रतिनिधी दिनांक- 14/11/2025
गडचिरोली जिल्ह्रातील सुरक्षा व कायदा सुव्यवस्था बळकट करण्यासाठी धानोरा तालुक्यातील पेंढरी कॅम्प कारवाफा अंतर्गत असलेल्या पोलीस मदत केंद्र चातगावला पोेेलीस स्टेशन म्हणून शासनाची मान्यता मिळाली आहे. या अन्वये नवीन पोलीस स्टेशन चातगाव ची निर्मिती करण्यात आली असून या भागातील गुन्हेगारी आणि माओवादी कारवायांवर नियंत्रण ठेवण्याकरिता प्रभावीपणे याचा वापर होण्यास मदत होणार आहे. पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल यांच्या हस्ते आज दिनांक 14/11/2025 रोजी पोेलीस स्टेशन चातगावचे उद्घाटन पार पडले.
सन 2010 साली चातगाव येथे पोलीस मदत केंद्राची निर्मीती करण्यात आली होती. सद्यस्थितीत पोेलीस स्टेशन चातगाव अंतर्गत 26 गावे जोडली जाणार असून त्यामुळे सदर भागातील नागरिकांना तात्काळ मदत व सुरक्षा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांसोबत पोलीसांचा संवाद वाढून नागरिकांकडून योग्य सहकार्य मिळून या भागात शांततेचे वातावरण निर्माण होईल. सदर उद्घाटनादरम्यान पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री नीलोत्पल यांनी पोस्टे चातगाव अंतर्गत सुरक्षा गार्ड (मोर्चा), पोलीस अधिकारी व अंमलदारांचे बॅरेक, एसआरपीएफ अंमलदार बॅरेंक, इत्यादींना भेट देवुन पोलीस स्टेशनच्या कामकाजाची पाहणी केली. यावेळी उपस्थित अधिकारी व अंमलदार यांना मार्गदशन करतांना पोलीस अधीक्षक श्री नीलोत्पल यांनी सांगितले की, “पोलीस मदत केंद्र चातगावचे पोलीस स्टेशन मध्ये रुपांतर झाल्याने नागरिकांना मदत मिळणे, तक्रार नोंदविणे सोपे होणार आहे. सर्व अधिकारी व अंमलदार यांनी सिसिटीएनएस, ई-साक्ष व नवीन कायद्यांचा कौशल्याने वापर करून नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात. तसेच नागरिकांसोबत सामंजस्यपूर्ण वागणूक ठेवून कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी प्रयत्न करावे.”
सदर कार्यक्रम प्रसंगी पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. एम.रमेश, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज जी., तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, पेंढरी कॅम्प कारवाफा श्री. जगदिश पांडे, पोस्टे चातगावचे प्रभारी अधिकारी पोउपनि चैतन्य काटकर व इतर अधिकारी आणि अंमलदार उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पोस्टे चातगाव चे प्रभारी अधिकारी श्री. चैतन्य काटकर व इतर अधिकारी आणि अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.



