एटापल्लीतील स्टेट बँक चोरी प्रकरण उघडकीस; दोन वेळा चोरीचा प्रयत्न करणारा आरोपी जेरबंद

एटापल्ली विदर्भ न्यूज 24 दिनांक:- 09 जानेवारी 2026
एटापल्ली येथील भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत सलग दोन वेळा चोरीचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस अखेर एटापल्ली पोलिसांनी अटक करून मोठे यश मिळवले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कौशल्यपूर्ण, तांत्रिक आणि गोपनीय तपास करत पोलिसांनी ही कारवाई केली असून बँक चोरीचा गंभीर गुन्हा पूर्णतः उघडकीस आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, दिनांक 16 डिसेंबर 2025 च्या मध्यरात्री एटापल्ली येथील भारतीय स्टेट बँक शाखेत एका अज्ञात आरोपीने खिडकीतून प्रवेश केला. कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन व बँकेतील लॉकर फोडून रोख रक्कम चोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र एटीएम व लॉकर फोडण्यात अपयश आल्याने आरोपीला चोरी करता आली नाही. या प्रकरणी पोलीस स्टेशन एटापल्ली येथे अज्ञात आरोपीविरुद्ध अप.क्र. 161/2025 अन्वये भा.न्या.सं. कलम 303 (2), 305 (ई), 331 (4), 324 (5), 62 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू असतानाच दिनांक 07 जानेवारी 2026 च्या मध्यरात्री त्याच अज्ञात आरोपीने पुन्हा एकदा भारतीय स्टेट बँक शाखेत प्रवेश करून यापूर्वीच्या पद्धतीने लॉकर फोडण्याचा दुसरा प्रयत्न केला. सलग दोन वेळा झालेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती.
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली, उपविभागीय पोलीस अधिकारी एटापल्ली श्री. चैतन्य कदम व पोलीस निरीक्षक एटापल्ली श्री. मच्छद्र नागरगोजे यांच्या नेतृत्वात विशेष तपास पथक गठित करण्यात आले. तपास पथकाने तांत्रिक पुरावे, सीसीटीव्ही विश्लेषण तसेच गोपनीय बातमीदारांच्या मदतीने तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
तपासादरम्यान संशयित इसम बिभास ऊर्फ संजु बच्चु डे (वय 23), रा. पीव्ही-92, पाखांजूर, जिल्हा कांकेर (छत्तीसगड) यास त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता, चौकशीअंती त्याने एटापल्ली येथील स्टेट बँकेत चोरीचा प्रयत्न केल्याची कबुली दिली. आरोपीच्या अटकेमुळे बँकेत झालेल्या दोन्ही चोरीच्या प्रयत्नांचा गुन्हा उघडकीस आला आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपीस मा. न्यायालयासमक्ष हजर केले असता, मा. न्यायालयाने त्यास दिनांक 12 जानेवारी 2026 पर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे. या गुन्ह्यांचा पुढील तपास मपोउपनि. रोहिणी गिरवलकर, पोलीस स्टेशन एटापल्ली करीत आहेत.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री. कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुलराज जी. यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तपास पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक मोतीराम मडावी, पोउपनि. गजानन साखरे, मपोउपनि. रोहिणी गिरवलकर, मपोउपनि. प्रतिक्षा वणवे तसेच पोलीस अंमलदारांचा मोलाचा सहभाग होता.
एटापल्ली पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे बँक चोरीसारख्या गंभीर गुन्ह्यांवर आळा बसण्यास मदत होणार असून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना बळकट झाली आहे.



