अहेरी नगरपंचायत कडूनच मिळणार विवाह प्रमाणपत्र — नगरसेवक अमोल गुडेल्लीवार यांच्या पाठपुराव्याला मिळाले यश!

अहेरी विशेष प्रतिनिधी दिनांक:-02 नवंबर 2025
अहेरी तालुक्यातील नागरिकांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. आता अहेरी नगरपंचायत कार्यालयातूनच ऑनलाईन विवाह प्रमाणपत्र (Marriage Certificate) मिळणार आहे. गेली अनेक वर्षे नागरिकांना विवाह प्रमाणपत्र मिळविण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती. मात्र, नगरसेवक अमोल गुडेल्लीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अखेर ही सुविधा अहेरी नगरपंचायतीत सुरू करण्यात आली आहे.
गेल्या दहा वर्षांपासून अहेरी नगरपंचायत अस्तित्वात असूनही येथील नागरिकांना विवाह प्रमाणपत्रासाठी उपजिल्हा रुग्णालयाचा दरवाजा ठोठवावा लागत होता. ऑनलाईन प्रक्रिया गुंतागुंतीची असल्याने अनेकांना प्रमाणपत्र मिळविण्यासाठी मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. परिणामी, नवविवाहित जोडप्यांची आधारकार्ड, मतदार ओळखपत्र, बँक खाते उघडणीसारखी महत्त्वाची कामे विलंबित होत होती.
ही गंभीर अडचण लक्षात घेत नगरसेवक अमोल गुडेल्लीवार यांनी तातडीने नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत हा मुद्दा मांडला. त्यांनी अहेरीचे मुख्याधिकारी गणेश शहाणे (C.O.) यांच्याकडे नागरिकांच्या वतीने ठोस मागणी केली की, “जसे जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्र मिळते, तसेच विवाह प्रमाणपत्र देखील नगरपंचायतीतूनच मिळावे.”
नगरसेवक गुडेल्लीवार यांनी प्रश्न उपस्थित केला की, वांगेपल्ली, कोत्तूर, चिंचगुंडी सारख्या ग्रामपंचायतींमध्ये ऑनलाईन विवाह प्रमाणपत्र सहज उपलब्ध असताना अहेरी नगरपंचायतीतच ही सुविधा का दिली जात नाही? त्यांच्या या प्रश्नानंतर प्रशासनाने गंभीरतेने दखल घेत, मुख्याधिकारी शहाणे यांनी तत्काळ संबंधित विभागाशी संपर्क साधून विवाह प्रमाणपत्र सॉफ्टवेअरची मागणी केली.
काही दिवसांपूर्वीच सॉफ्टवेअरची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अहेरी नगरपंचायतीत पहिली विवाह नोंदणी आणि ऑनलाईन प्रमाणपत्र जारी करण्यात आले आहे. यामुळे अहेरी शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
नगरसेवक अमोल गुडेल्लीवार यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, “आता अहेरी शहरातील नागरिकांनी आपल्या विवाहाची नोंदणी थेट नगरपंचायतीत करून अधिकृत प्रमाणपत्र घ्यावे. ही सुविधा नागरिकांच्या वेळेची आणि पैशाची मोठी बचत करेल.”
स्थानिक नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत करत नगरसेवक गुडेल्लीवार यांचे मन:पूर्वक आभार मानले आहेत.
अहेरीकरांसाठी ही सुविधा ठरणार दिलासादायक!
रिपोर्ट – विदर्भ न्यूज 24, अहेरी



