नागपूरात ३६व्या MEMC सप्ताहात लॉयड्स मेटल्सची घवघवीत कामगिरी….
सुरजागड आयर्न ओअर माइन्सला राष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कार

नागपूर,(प्रतिनिधी) दिनांक: 05 जानेवारी 2026
पर्यावरणपूरक व शाश्वत खाणकामाच्या दिशेने देशभरात सुरू असलेल्या प्रयत्नांचा गौरव करणारा ३६वा मायन्स एन्व्हायर्नमेंट अँड मिनरल कन्झर्व्हेशन (MEMC) सप्ताह नागपूर येथील हॉटेल रीजेंटा येथे उत्साहात पार पडला. भारतीय खान ब्युरो (IBM) यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या प्रतिष्ठित कार्यक्रमात देशभरातील खाण उद्योगाशी संबंधित तज्ज्ञ, उद्योजक, अधिकारी व विविध भागधारकांनी सहभाग नोंदवला.
या राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमात लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड (LMEL) यांच्या सुरजागड आयर्न ओअर माइन्सने ‘फुली-मेकनाइज्ड ओपन कास्ट माइन्स’ या श्रेणीत संयुक्त द्वितीय पुरस्कार पटकावत विदर्भासह गडचिरोली जिल्ह्याचा नावलौकिक वाढवला. हा पुरस्कार अल्ट्राटेक सिमेंटच्या नाओकारी लाइमस्टोन माइन्स सोबत संयुक्तपणे प्रदान करण्यात आला. विशेष म्हणजे हा सन्मान LMEL च्या महिला टीमने स्वीकारला, जो खाण क्षेत्रातील महिला सहभाग व समावेशकतेचा ठोस संदेश देणारा ठरला.
MEMC सप्ताहात पर्यावरण संरक्षण, शाश्वत खाणकाम, खनिज संवर्धन तसेच उत्तम कार्यपद्धतींवर आधारित सादरीकरणे करण्यात आली. यावेळी लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडने ग्रीन माइनिंग, कमी दर्जाच्या खनिजांचे बेनिफिशिएशन, BHQ (बँडेड हेमेटाईट क्वार्ट्झाईट) चा परिणामकारक वापर, स्लरी पाइपलाईन प्रकल्प, पेलेट प्लांट संचालन तसेच कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती सादर केली.
कार्यक्रमातील विशेष आकर्षण ठरला तो LMEL च्या महिला कर्मचाऱ्यांचा आत्मविश्वासपूर्ण सहभाग. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधत त्यांनी आपल्या कामाचा, तांत्रिक अनुभवांचा व नेतृत्व क्षमतेचा प्रभावी आढावा मांडला. खाण उद्योगात महिलांची वाढती भूमिका आणि विविधतेला प्रोत्साहन देणाऱ्या या प्रयत्नांचे उपस्थित अधिकाऱ्यांनी विशेष कौतुक केले.
या यशाबद्दल कंपनीच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करत लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्री. बी. प्रभाकरन यांनी कंपनीच्या हरित, स्वच्छ व शाश्वत खाणकामाच्या दृष्टीकोनावर भर दिला. राष्ट्रीय पातळीवर लॉयड्सचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचे त्यांनी विशेष अभिनंदन केले तसेच महिला सक्षमीकरणाबाबत कंपनीची ठाम बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित केली.
३६व्या MEMC सप्ताहात LMEL – सुरजागड आयर्न ओअर माइन्सला मिळालेले पुरस्कार :
• कमी दर्जाच्या खनिजांचे बेनिफिशिएशन व उपयोग – प्रथम पुरस्कार
• वनीकरण – प्रथम पुरस्कार
• शाश्वत विकास – द्वितीय पुरस्कार
• पद्धतशीर व शास्त्रीय विकास – तृतीय पुरस्कार
• एकूण कामगिरी (ओव्हरऑल) – द्वितीय पुरस्कार
हे सर्व पुरस्कार पर्यावरण संरक्षण, जबाबदार संसाधन व्यवस्थापन आणि शाश्वत खाणकामात लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे नेतृत्व अधोरेखित करणारे ठरले आहेत. विदर्भासाठी आणि गडचिरोली जिल्ह्यासाठी ही बाब अभिमानास्पद असल्याचे मत उद्योग क्षेत्रातून व्यक्त होत आहे.
— विदर्भ न्यूज 24



