अहेरी पोलिसांची मोठी कारवाई : अवैध दारू विक्रीवर घाव, ३ लाख ३३ हजारांचा मुद्देमाल जप्त…

अहेरी विदर्भ न्यूज 24 नेटवर्क दिनांक:-03 जानेवारी 2026
अहेरी तालुक्यात अवैध दारू विक्रेत्यांवर पोलिसांनी जोरदार ‘ब्रेक’ लावला असून, आलापल्ली येथील एका घरावर टाकलेल्या धाडीत देशी-विदेशी दारूचा तब्बल ३ लाख ३३ हजार १८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नववर्षातच अवैध धंदेवाल्यांना स्पष्ट संदेश देणारी ही कारवाई ठरली आहे.
माननीय पोलीस अधीक्षक, गडचिरोली यांच्या अवैध धंद्यांविरोधातील कठोर आदेशानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस स्टेशन अहेरीचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री. हर्षल एकरे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. दि. २ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान आलापल्ली (ता. अहेरी) येथे मुखबिराच्या खात्रीशीर माहितीनुसार ही धाड टाकण्यात आली.
पोलिसांनी आरोपी नरेश लक्ष्मण मिसाल (वय ३५), वनिता सचिन मिसाल (वय २६) व सुशीला मधुकर ईरबत्तनवार (वय ६०) यांच्या राहत्या घराची पंचासमक्ष झडती घेतली. घरात व घराबाहेरील ठिकाणी मोठ्या प्रमाणावर विविध नामांकित कंपन्यांची देशी व विदेशी दारू साठवून ठेवलेली आढळून आली. व्हिस्की, रम, बीयर, वोडका तसेच देशी दारूचे शेकडो नग मिळून आले.
या प्रकरणी पोलीस स्टेशन अहेरी येथे अप.क्र. ००६/२०२६, कलम ६५(ई), ८३ महाराष्ट्र दारूबंदी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी म्हणून पोलीस उपनिरीक्षक चैतन्य दत्तात्रय घावटे यांनी तक्रार नोंदवली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश वळवी करीत आहेत.
विशेष म्हणजे, जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालात रॉयल स्टॅग, ओल्ड मोंक, ओकस्मिथ, आयकोनिक व्हाइट, ऑफिसर्स चॉईस, ब्लॅक बकार्डी यांसारख्या महागड्या ब्रँड्सचा समावेश असून, अवैध विक्रीसाठी हा साठा करण्यात आल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
ही संपूर्ण कारवाई सपोनि मंगेश वळवी, पोउनि चैतन्य घावटे, पोलीस हवालदार वि.डी.पी., प्रशांत कांबळे, राकेश करमे, पोलीस शिपाई दरौ, जनबंधू, मपोहवा पेंदाम, राठोड आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी यशस्वीपणे पार पाडली.
अहेरी तालुक्यात अवैध दारू विक्रीमुळे सामाजिक प्रश्न निर्माण होत असताना, पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे दारू माफियांमध्ये खळबळ उडाली आहे. “कायदा हातात घेणाऱ्यांना माफी नाही,” असा थेट संदेश देणारी ही कारवाई असल्याचे बोलले जात असून, पुढील काळातही अशाच कठोर कारवाया सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
— विदर्भ न्यूज २४



