अहेरीत विज्ञानाचा जयघोष; जिल्हा स्तरीय भव्य ‘विज्ञान दिंडी’ उत्साहात संपन्न…
विज्ञानाची कास धरा, अंधश्रद्धा दूर करा; शेकडो विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग.....

अहेरी प्रतिनिधी विदर्भ न्यूज 24 दिनांक:– 4 जानेवारी 2024
“विज्ञान घडवते भविष्य”, “अंधश्रद्धा सोडा, विज्ञान जोडा” आणि “प्रश्न विचारा, प्रयोग करा” या जोशपूर्ण घोषणांनी आज अहेरी नगरी अक्षरशः दुमदुमून गेली. जिल्हा स्तरीय भव्य विज्ञान दिंडी अहेरीत मोठ्या उत्साहात पार पडली. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे आणि समाजात विज्ञानाबाबत जागृती निर्माण करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
दिनांक ४ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९ वाजता स्थानिक हॉकी मैदानावरून या विज्ञान दिंडीचा प्रारंभ झाला. अहेरीच्या नगराध्यक्षा कु. रोजा करपेत आणि गटशिक्षणाधिकारी सुनील आईंचावार यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून दिंडीला शुभारंभ करण्यात आला.
अहेरी परिसरातील विविध शाळा व महाविद्यालयांमधील शेकडो विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा, वैज्ञानिक मॉडेल्स, माहितीपूर्ण फलक व घोषणांसह या दिंडीत सहभाग घेतला. दिंडी शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत असताना नागरिकांनी ठिकठिकाणी थांबून विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे कौतुक केले. अहेरीच्या मुख्य चौकात या दिंडीचा समारोप करण्यात आला.
या उपक्रमाला माध्यमिक शिक्षणाधिकारी वासुदेव भुसे, उपशिक्षणाधिकारी अमरशिंग गेडाम, डायटचे प्राचार्य बळीराम चौरे यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला. शिक्षण क्षेत्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग ही या विज्ञान दिंडीची विशेष बाब ठरली.
विद्यार्थ्यांचे कल्पक व प्रभावी सादरीकरण
विज्ञान दिंडीचे मुख्य आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांनी सादर केलेले सौर ऊर्जा, पर्यावरण संरक्षण, जलसंधारण, आरोग्यविषयक विज्ञान आणि दैनंदिन जीवनातील वैज्ञानिक संकल्पनांवरील मॉडेल्स. माहितीपूर्ण तक्ते आणि प्रभावी घोषणांमुळे विज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले. लेझीम पथकाच्या सादरीकरणाने वातावरणात उत्साहाची लाट पसरली.
यावेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी वासुदेव भुसे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की,
“केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे नाही. प्रश्न विचारण्याची सवय, प्रयोगशील वृत्ती आणि तर्कशुद्ध विचार यातूनच खरा वैज्ञानिक दृष्टिकोन तयार होतो. अशा उपक्रमांतूनच उद्याचे शास्त्रज्ञ घडतात.”
अंधश्रद्धा निर्मूलनाचा ठोस संदेश
या विज्ञान दिंडीत अंधश्रद्धा निर्मूलनावर विशेष भर देण्यात आला. तथाकथित चमत्कारांमागील वैज्ञानिक सत्य स्पष्ट करणारे फलक नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक विचारांची रुजवणूक होत असल्याचे चित्र या दिंडीतून स्पष्टपणे दिसून आले.
मान्यवरांची उपस्थिती
या विज्ञान दिंडी व विज्ञान प्रदर्शनाला माध्यमिक शिक्षणाधिकारी वासुदेव भुसे, उपशिक्षणाधिकारी अमरशिंग गेडाम, डायट प्राचार्य बळीराम चौरे, गटशिक्षणाधिकारी सुनील आईंचावार, नगराध्यक्षा कु. रोजा करपेत,
मुख्याध्यापक गजानन लोणबले, प्रियांका डांगेवार, सिस्टर जिसमेरी, महेश वाढई, शाहीद शेख, प्रणय येगलोपवार, वितोंडे सर, अरुण गोटेफोडे, तालीफ सैय्यद, संतोष जोशी, रोहनकर सर, रामगिरवार सर, विशाल बंडावार, जी. महेश, कोडेलवार सर,विज्ञान शिक्षिका जयश्री खोंडे, केंद्रप्रमुख उमेश चिलवेलवार, प्रवीण पुलूरवार, दिवाकर नारनवरे, सतीश खाटेकर, संजय देशपांडे, सुधाकर टेकूल,बीआरसी अहेरीचे विशेष शिक्षक पंकज मानकर, राजू नागरे, जितेंद्र राहुल, अरुण जक्कोजवार, भुरसे सर, कांबळे मॅडम, खराबे मॅडम, रामटेके मॅडम ,यांच्यासह अहेरी–आलापल्ली परिसरातील शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी व शेकडो विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा शिक्षण विभाग व स्थानिक शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.
अहेरीतील ही जिल्हा स्तरीय विज्ञान दिंडी केवळ मिरवणूक न ठरता, वैज्ञानिक विचारांची रुजवणूक करणारी प्रभावी चळवळ ठरली, असेच चित्र या उपक्रमातून दिसून आले.



