मुख्य अभियंता, कंत्राटदारावर ‘सदोष मनुष्यवधाचा’ गुन्हा दाखल करण्याची सामाजिक कार्यकर्ता संतोष ता्टीकोंडावार यांची मागणी!
राष्ट्रीय महामार्गावरील अपघातात चालकाचा मृत्यू; दिशादर्शक फलक नसल्याने निष्काळजीपणा उघड

सिरोंचा विदर्भ न्यूज 24 नेटवर्क दिनांक :28/10/2025
सिरोंचा तालुक्यातील बामणी पोलीस स्टेशनसमोर झालेल्या भीषण अपघातामध्ये पिंटीपाका येथील एका ट्रॅक्टर चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. राष्ट्रीय महामार्गावर कोणत्याही प्रकारचे दिशादर्शक, सूचना फलक किंवा ‘सावधान’ बोर्ड न लावल्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात घडल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. या गंभीर निष्काळजीपणाबद्दल, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे मुख्य अभियंता, राष्ट्रीय महामार्ग, मुंबई आणि कंत्राटदार ए. सी. शेख कन्स्ट्रक्शन कंपनी, औरंगाबाद यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी जनकल्याण समाजोन्नती अन्याय भ्रष्टाचार निवारण समिती गडचिरोली जिल्ह्या अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी केली आहे.
काल सायंकाळी बामणी गावाजवळ हा अपघात झाला. प्राथमिक माहितीनुसार, सदर राष्ट्रीय महामार्गाच्या कामादरम्यान रस्ता प्राधिकरण आणि कंत्राटदाराने रस्त्यावर आवश्यक असणारे धोक्याचे फलक, दिशादर्शक बोर्ड किंवा कोणत्याही प्रकारच्या सूचना लावलेल्या नव्हत्या. यामुळे वाहन चालकाला रस्त्याच्या स्थितीचा अंदाज आला नाही, परिणामी त्याचे नियंत्रण सुटले आणि अपघात होऊन जागेवरच त्याचा मृत्यू झाला. पिंटीपाका येथील ट्रॅक्टर चालक या अपघातात बळी पडला.
२ कोटी नुकसान भरपाईची मागणी:
स्थानिक नागरिक आणि मृताच्या कुटुंबीयांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून दोन कोटी रुपये देण्याची मागणी करण्यात आली आहे.
या संपूर्ण घटनेसाठी रस्ता प्राधिकरण आणि कंत्राटदार कंपनी पूर्णपणे जबाबदार आहेत. तात्काळ सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून पीडित कुटुंबाला न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे, अन्यथा मोठे जनआंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.



