गडचिरोली प्रतिनिधी विदर्भ न्यूज 24 दिनांक:- 8 फेब्रुवारी 2026
लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडतर्फे ऑस्ट्रेलियातील कर्टिन विद्यापीठात पूर्ण प्रायोजित उच्च शिक्षण
गडचिरोली जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी आंतरराष्ट्रीय शिक्षणाचे स्वप्न प्रत्यक्षात साकारत लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड (LMEL) यांनी आपल्या कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीअंतर्गत एक महत्त्वपूर्ण आणि दूरगामी उपक्रम राबविला आहे. कंपनीतर्फे गडचिरोलीतील तब्बल 24 विद्यार्थ्यांना ऑस्ट्रेलियातील पर्थ येथील नामांकित कर्टिन विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी पूर्णतः प्रायोजित करण्यात आले आहे. दीर्घकाळ उग्रवाद, मागासलेपणा आणि संधींच्या अभावाने ग्रासलेल्या या जिल्ह्यासाठी हा उपक्रम आशेचा नवा किरण ठरत आहे.
सुरजागड लोहखनिज खाणींचे पूर्ण क्षमतेने कामकाज सुरू झाल्यानंतर, LMEL ने औद्योगिक प्रगतीचा लाभ केवळ आर्थिक आकड्यांपुरता न ठेवता तो सामाजिक परिवर्तनाशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. बी. प्रभाकरण यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम आकाराला आला असून, उद्योगातून निर्माण होणारी समृद्धी स्थानिक युवकांच्या शिक्षणासाठी वापरण्याची भूमिका कंपनीने घेतली आहे.
दि. 4 मार्च 2024 रोजी ‘अॅडव्हान्टेज विदर्भ’ कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी माध्यमांशी संवाद साधताना श्री. प्रभाकरण यांनी गडचिरोलीतील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण देण्याचे वचन दिले होते. अवघ्या काही महिन्यांत ते वचन पूर्ण करत हा उपक्रम प्रत्यक्षात उतरवण्यात आला आहे. ग्रामीण महाराष्ट्राला आंतरराष्ट्रीय शैक्षणिक प्रवाहाशी जोडणे आणि दीर्घकाळ संघर्षग्रस्त राहिलेल्या गडचिरोलीसाठी शाश्वत भविष्य घडवणे, हा या उपक्रमामागचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सध्या या योजनेअंतर्गत बॅच 1 आणि बॅच 2 मधील 10 विद्यार्थी ऑस्ट्रेलियातील पर्थ येथे शिक्षण घेत असून, आणखी 14 विद्यार्थ्यांना व्हिसा मंजूर झाला आहे. हे विद्यार्थी लवकरच आपल्या अभ्यासक्रमांना सुरुवात करणार आहेत. कर्टिन विद्यापीठात हे सर्व विद्यार्थी अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन विषयांमध्ये उच्च शिक्षण घेत आहेत. पदवी पूर्ण केल्यानंतर या विद्यार्थ्यांना लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पदांवर नोकरीची संधी दिली जाणार असून, पुढे ते कर्मचारी शेअर मालकी योजना (ESOP) साठीही पात्र ठरणार आहेत.
या उपक्रमाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी आणि श्री. बी. प्रभाकरण यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बोर्डिंग पास प्रदान करण्यात आले. यावेळी श्री. गडकरी यांनी या उपक्रमाचे कौतुक करत, गडचिरोलीसारख्या जिल्ह्यांमध्येही भविष्यात आंतरराष्ट्रीय दर्जाची शैक्षणिक संस्थाने उभी राहतील, असा विश्वास व्यक्त केला.
“लॉयड्स–कर्टिन पूर्णतः प्रायोजित शैक्षणिक कार्यक्रम” अंतर्गत LMEL कडून विद्यार्थ्यांचे 100 टक्के शिक्षण शुल्क, निवास व्यवस्था, राहणीमान खर्च, आंतरराष्ट्रीय प्रवास तसेच प्रशासकीय खर्च वहन केला जात आहे. कंपनी दरवर्षी प्रति विद्यार्थ्यांमागे सुमारे 50 लाख रुपयांचा खर्च करत असून, एकूण गुंतवणूक प्रति विद्यार्थी अंदाजे 1.5 कोटी ते 2 कोटी रुपयांपर्यंत आहे.
लॉयड्स इन्फिनिट फाउंडेशनमार्फत राबविण्यात येणारा हा उपक्रम तळागाळातील गुणवंत विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना भविष्यातील नेतृत्वासाठी सक्षम बनवण्यावर केंद्रित आहे. संसाधनांपुरती मर्यादित न राहता, गडचिरोलीतील लोकांमध्ये गुंतवणूक करण्याची भूमिका या उपक्रमातून स्पष्ट होते. शिक्षणाच्या माध्यमातून जिल्ह्याचा चेहरा बदलण्याच्या दिशेने हा उपक्रम महत्त्वाचा टप्पा ठरत असून, गडचिरोलीच्या विकासाच्या कथेत एक नवा अध्याय जोडला गेला आहे.
— विदर्भ न्यूज 24