गडचिरोली प्रतिनिधी (विदर्भ न्यूज 24) 12 फेब्रुवारी 2026
गडचिरोली जिल्हा पोलीस दल भरती (२०२४–२५) अंतर्गत चालक पोलीस शिपाई पदाकरिता सुरू असलेल्या मैदानी चाचण्यांना तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आज गुरुवारी दि. १२ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या मैदानी चाचणीसाठी एकूण १,५०० उमेदवारांना बोलावण्यात आले होते.
यापैकी १,१६१ तरुण प्रत्यक्ष चाचणीसाठी उपस्थित राहिले. उपस्थित उमेदवारांपैकी पात्र ठरलेल्या १,०३१ तरुणांची चालक पोलीस शिपाई पदासाठीची मैदानी चाचणी यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली.
पोलीस प्रशासनाच्या वतीने मैदानी चाचणीदरम्यान उत्कृष्ट नियोजन करण्यात आले होते. उमेदवारांची नोंदणी, शारीरिक चाचण्या, वैद्यकीय सुविधा तसेच शिस्तबद्ध रांगा यामुळे संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि सुरळीत पार पडली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
ग्रामीण व दुर्गम भागातील तरुण मोठ्या संख्येने या भरती प्रक्रियेत सहभागी झाले असून, शासकीय सेवेत दाखल होण्याच्या संधीसाठी उमेदवारांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.
गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या या भरती प्रक्रियेमुळे जिल्ह्यातील तरुणांना रोजगाराची संधी मिळणार असून, आगामी दिवसांत उर्वरित टप्प्याही याच नियोजनबद्ध पद्धतीने पार पडणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
— विदर्भ न्यूज 24
