आष्टी,विदर्भ न्यूज 24 नेटवर्क दिनांक:-23मार्च 2026
आष्टी येथे एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून पाणी काढताना तोल जाऊन विहिरीत पडल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मृतकाचे नाव श्रीकांत (सोनू) नानाजी दुर्गे (वय ३३ वर्षे, रा. आष्टी) असे आहे. श्रीकांत हे मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. मिळालेल्या माहितीनुसार, ते आपल्या घरासमोरील विहिरीतून बादलीच्या साहाय्याने पाणी काढत होते. यावेळी अचानक त्यांचा तोल गेला आणि ते थेट विहिरीत कोसळले.
या अपघातात बादलीचा दोर त्यांच्या अंगाला गुंडाळला गेला. त्यामुळे त्यांना बाहेर येण्याची कोणतीही संधी मिळाली नाही आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी तातडीने आष्टी पोलिसांना माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला आणि पुढील प्रक्रिया करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
श्रीकांत यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी तसेच मोठा आप्तपरिवार आहे. कुटुंबाचा आधारस्तंभ असलेल्या तरुणाच्या अचानक निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान, या घटनेचा पुढील तपास आष्टी पोलीस करीत आहेत.
विहिरीभोवती सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
ग्रामीण भागात अजूनही विहिरींना योग्य संरक्षण नसल्यामुळे अशा दुर्घटना वारंवार घडत आहेत. संबंधित यंत्रणांनी याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे असल्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.
#आष्टी #अपघात #विहीरदुर्घटना #विदर्भन्यूज24 #ग्रामीणबातम्या
