कुरखेडा प्रतिनिधी | विदर्भ न्यूज 24 दिनांक:-14मे 2026
कुरखेडा तालुक्यातील मक्का खरेदी प्रक्रियेमधील अडचणी दूर करून शासकीय खरेदी केंद्र सुरळीतपणे चालविण्याच्या उद्देशाने अधिकारी, पदाधिकारी आणि शेतकरी यांच्या उपस्थितीत नियोजन बैठक पार पडली. तालुक्यात मोठ्या प्रमाणात मका उत्पादन झाल्याने शेतकऱ्यांना वेळेत आणि सुलभ पद्धतीने मका विक्री करता यावी, यासाठी बैठकीत विविध महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
बैठकीला कुरखेडा उपविभागीय अधिकारी किरण वाघस्कर, प्रभारी तहसीलदार शशिकांत जाधव, नायब तहसीलदार राजकुमार धनबाते, आदिवासी विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक सोपान सांबारे, संचालक गोपाल उईके, यशवंत चौरीकर, अविका कुरखेडा अध्यक्ष बाबुराव तुलावी, उपाध्यक्ष चांगदेव फाये, संचालक हिराजी माकडे, जिल्हा सहकारी बोर्ड अध्यक्ष वसंतराव मेश्राम, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक विनोद खुणे, हेमंत शेंद्रे यांच्यासह अनेक पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.
बैठकीत कुरखेडा तालुक्यातील विविध आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांमध्ये नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या मका खरेदी प्रक्रियेवर सविस्तर चर्चा करण्यात आली. आदिवासी विकास महामंडळाच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था कुरखेडा अंतर्गत शासकीय मका खरेदी केंद्र मंजूर करण्यात आले असून त्याठिकाणी दिवसनिहाय मक्का विक्रीची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यानुसार कुरखेडा आविका केंद्रात नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांसाठी सोमवार व मंगळवार, गोठणगाव केंद्रातील शेतकऱ्यांसाठी बुधवार व गुरुवार, कढोली केंद्रातील शेतकऱ्यांसाठी शुक्रवार तर गेवर्धा केंद्रातील नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी शनिवार हा दिवस निश्चित करण्यात आला आहे. ही संपूर्ण व्यवस्था कुरखेडा येथील पुरवठा विभागाच्या शासकीय गोदामात करण्यात येणार असून खरेदी केंद्रावर दोन काट्यांचीही व्यवस्था करण्यात येणार आहे.
बैठकीदरम्यान उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व शेतकऱ्यांनी मका खरेदीसाठी पुरेशी गोदाम व्यवस्था, बारदान्याची उपलब्धता आणि शेतकऱ्यांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी केली. तसेच मका खरेदीचा लक्षांक वाढवून तालुक्यात अतिरिक्त खरेदी केंद्र सुरू करण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली. विक्री झालेल्या मकाचे चुकारे त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावेत, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
कुरखेडा तालुक्यात यंदा मोठ्या प्रमाणात मक्का लागवड झाली असून शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी शेतकरी बांधवांकडून सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आदिवासी विकास महामंडळाच्या मार्गदर्शनाखाली कुरखेडा आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेने पुढाकार घेत जिल्ह्यातील पहिले मका खरेदी केंद्र सुरू केल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. बैठकीत उपस्थित शेतकऱ्यांनी या उपक्रमाचे स्वागत करत प्रशासनाकडून खरेदी प्रक्रिया अधिक गतिमान करण्याची अपेक्षा व्यक्त केली.
