गडचिरोली विशेष प्रतिनिधी दिनांक:- 10 ऑगस्ट 2026
जागतिक आदिवासी दिनाचा उत्साह जिल्हाभरात सुरू असतानाच धानोरा तालुक्यातील जपतलाई येथून काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. अनुदानित आदिवासी आश्रमशाळेच्या वसतिगृहात झोपलेल्या विद्यार्थिनींना विषारी सापाने दंश केल्याने तीन निष्पाप विद्यार्थिनींचा मृत्यू झाला असून आणखी तीन विद्यार्थिनी गंभीर अवस्थेत उपचार घेत आहेत. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
धानोरा तालुका मुख्यालयापासून सुमारे दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या जपतलाई येथील कुप्पा लिंगो शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन शाळा तथा अनुदानित आश्रमशाळेच्या वसतिगृहात ही दुर्घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, वसतिगृहात विद्यार्थिनींच्या संख्येच्या तुलनेत पुरेशा खाटा उपलब्ध नसल्याने काही विद्यार्थिनी जमिनीवर गाद्या अंथरून झोपत होत्या. मध्यरात्री झोपेत असतानाच विषारी सापाने काही विद्यार्थिनींना दंश केला. घटनेची माहिती मिळताच संबंधित विद्यार्थिनींना तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र, वैद्यकीय उपचार सुरू होण्यापूर्वी अथवा उपचारादरम्यान तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला.
या दुर्घटनेत सुश्मिता सरोजित मंडल (१४), दीपिका एतवा लकडा (१२) आणि अनु गजुराम कोरेटी (८) या विद्यार्थिनींचा मृत्यू झाला आहे. तर दीपिका बिटलूरसाय मडावी (११), समृद्धी सुरेश नैताम (१४) आणि कविता राजकुमार किरंगा (१२) या तीन विद्यार्थिनींवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
या घटनेनंतर आश्रमशाळेच्या व्यवस्थापनाबाबत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. विद्यार्थिनींना जमिनीवर झोपण्याची वेळ का आली, वसतिगृहात पुरेशा खाटांची व्यवस्था का करण्यात आली नव्हती, परिसरात सर्पप्रतिबंधक उपाययोजना करण्यात आल्या होत्या का, वसतिगृहाची नियमित पाहणी केली जात होती का, तसेच रात्रीच्या वेळी विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी जबाबदार कर्मचारी उपस्थित होते का, असे प्रश्न आता पालक आणि नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.
घटना घडली त्यावेळी वसतिगृहाच्या महिला अधीक्षिका उपस्थित नसल्याची माहितीही समोर येत आहे. त्यामुळे विद्यार्थिनींच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या यंत्रणेच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दुर्गम आणि आदिवासी भागातील पालक आपल्या मुलांना शिक्षणासाठी आश्रमशाळेत पाठवतात. शासनाच्या व्यवस्थेवर विश्वास ठेवून मुलांना वसतिगृहात ठेवले जाते. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या निवासाची सुरक्षित व्यवस्था करणे आणि आपत्कालीन प्रसंगी तातडीने वैद्यकीय मदत उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची तसेच संबंधित संस्थेची जबाबदारी आहे.
जपतलाई येथील या घटनेनंतर राजकीय आणि सामाजिक स्तरातूनही संताप व्यक्त केला जात आहे. आझाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करत आश्रमशाळांच्या दुरवस्थेचा मुद्दा उपस्थित केला आहे. संस्थाचालक आणि प्रकल्प अधिकारी वातानुकूलित कार्यालयात सुरक्षित असताना आदिवासी आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांची अवस्था अत्यंत दयनीय असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. निष्काळजीपणामुळे निष्पाप विद्यार्थिनींचा जीव गेला असल्यास संबंधित प्रकल्प अधिकाऱ्यांवर तातडीने निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विश्वजित कोवासे यांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले असून, नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा आणि प्रथम आपल्या शाळा व वसतिगृहातील व्यवस्थेकडे लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, या दुर्घटनेची सखोल चौकशी करून नेमकी चूक कुठे झाली, विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी असलेल्या नियमांचे पालन झाले होते का आणि घटनेच्या वेळी जबाबदार अधिकारी किंवा कर्मचारी उपस्थित होते का, याचा तपास होणे आवश्यक आहे. केवळ मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देऊन हा विषय संपविण्याऐवजी आश्रमशाळांमधील सुरक्षाव्यवस्थेचे सर्वंकष ऑडिट करण्याची गरज निर्माण झाली आहे.
वसतिगृह परिसरातील स्वच्छता, झुडपे व गवताची नियमित साफसफाई, सर्पप्रतिबंधक उपाययोजना, विद्यार्थ्यांसाठी पुरेशा खाटा, रात्रीच्या वेळी जबाबदार कर्मचाऱ्यांची उपस्थिती, आपत्कालीन वैद्यकीय सुविधा आणि सर्पदंशाच्या उपचारासाठी आवश्यक औषधांचा उपलब्ध साठा याबाबत प्रशासनाने ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे.
जागतिक आदिवासी दिनाच्या दिवशी आदिवासी विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न अशा दुर्दैवी पद्धतीने समोर येणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. जपतलाई येथील तीन निष्पाप विद्यार्थिनींच्या मृत्यूची घटना भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाला जाग आणणारी ठरावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी कायमस्वरूपी प्रभावी व्यवस्था उभी करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.
