गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी दिनांक:– 9 मार्च 2025:
नक्षलप्रभावित आणि अतिदुर्गम भागात सुरक्षा आणि विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड उपविभागांतर्गत कवंडे येथे नवीन पोलीस स्टेशनची स्थापना करण्यात आली. केवळ 24 तासांत हे पोलीस स्टेशन उभारण्यात आले असून, या उपक्रमासाठी 1000 हून अधिक सुरक्षा दलाचे जवान, 25 बीडीडीएस पथके, विशेष पोलीस अधिकारी आणि खाजगी कंत्राटदारांचा सहभाग होता.
नव्या पोलीस स्टेशनच्या उद्घाटन समारंभाला विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) संदीप पाटील, पोलीस उपमहानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र अंकित गोयल, पोलीस उपमहानिरीक्षक सीआरपीएफ अजय कुमार शर्मा, जिल्हा पोलीस अधीक्षक नीलोत्पल, कमांडंट 37 बटालियन सीआरपीएफ दाओ इंजीरकान कींडो आणि स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.
विकासाच्या दिशेने मोठे पाऊल
गडचिरोली जिल्ह्यात मागील दोन वर्षांत सात नवीन पोलीस ठाण्यांची स्थापना करण्यात आली आहे. या भागातील सुरक्षाव्यवस्था मजबूत करण्यासाठी आणि स्थानिक नागरिकांचा विकास होण्यासाठी पोलीस प्रशासन सातत्याने प्रयत्नशील आहे. 2024 च्या अखेरीस पेनगुंडा येथे नवीन पोलीस मदत केंद्र सुरू करण्यात आले होते, तर यावर्षी जानेवारी महिन्यात नेलगुंडा येथे नवीन पोलीस स्टेशनची उभारणी करण्यात आली होती.
कवंडे येथे पोलीस स्टेशनच्या उभारणीसाठी भामरागडपासून 25 किमी अंतरावर असलेल्या या दुर्गम भागात 6 किमीचा नवीन कच्चा रस्ता केवळ दोन दिवसांत तयार करण्यात आला. या पोलीस स्टेशनमध्ये अत्याधुनिक सुविधा उभारण्यात आल्या असून, त्यात वायफाय सेवा, 16 पोर्टा केबिन, आरओ प्लांट, मोबाईल टॉवर, सुरक्षेसाठी मॅक वॉल, बीपी मोर्चा आणि सँड बॅरिकेडिंग यांचा समावेश आहे.
माओवाद्यांच्या कारवायांना आळा घालण्याचा प्रयत्न
पोलीस स्टेशन उभारणीदरम्यान सुरक्षेसाठी गडचिरोली पोलीस दलाचे चार अधिकारी आणि 41 पोलीस कर्मचारी, एसआरपीएफ ग्रुप 11 नवी मुंबईचे दोन प्लाटून, सीआरपीएफ 37 बटालियनचे 69 जवान, तसेच विशेष अभियान पथकाचे 200 कमांडो तैनात करण्यात आले होते. यासोबतच सीआरपीएफच्या क्यूआरटी पथकाचे 50 कमांडोही या मोहिमेत सहभागी झाले होते.
पोलीस प्रशासनाने या भागात माओवाद्यांचे काही स्मारक नष्ट केले असून, स्थानिक नागरिकांना विविध गरजेच्या वस्तूंचे वाटप करण्यात आले. महिलांना नववारी साड्या, पुरुषांना ताडपत्री व शेतीसाठी आवश्यक साधने, तर मुलांना शैक्षणिक साहित्य आणि खेळाच्या वस्तू दिल्या गेल्या.
या भागातील नागरिकांनी नवीन पोलीस स्टेशनच्या स्थापनेबद्दल समाधान व्यक्त करत पोलीस दलाचे आभार मानले. पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले की, “या पोलीस स्टेशनच्या स्थापनेमुळे या भागाचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल आणि नागरिकांना सुरक्षिततेची भावना मिळेल.”