सिरोंचा विशेष प्रतिनिधी दिनांक 3 सप्टेंबर 2026
सिरोंचा तालुक्यात आज पहाटे ४ वाजून ३६ मिनिटांच्या सुमारास ३.६ तीव्रतेचा भूकंप झाल्याची नोंद झाली. भूकंपाची खोली सुमारे १० किलोमीटर असून, प्राथमिक माहितीनुसार भूकंपाचे केंद्र सिरोंचा तालुक्यातील राखीव वनक्षेत्र परिसरात असल्याचे समोर आले आहे.
या भूकंपाचे सौम्य धक्के अहेरी आणि नागेपल्ली परिसरातही जाणवल्याची माहिती अहेरी तहसील प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे. पहाटेच्या सुमारास अचानक जाणवलेल्या धक्क्यामुळे काही काळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
दरम्यान, प्राथमिक माहितीनुसार भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. स्थानिक प्रशासनाकडून परिस्थितीची माहिती घेतली जात असून, संभाव्य नुकसानीबाबत पाहणी सुरू आहे.
जिल्हाधिकाऱ्यांचे नागरिकांना आवाहन
भूकंपाचे धक्के सौम्य स्वरूपाचे असून नागरिकांनी घाबरून न जाता शांतता राखावी आणि आवश्यक ती दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे. तसेच भूकंपाबाबत सोशल मीडियावर किंवा इतर माध्यमातून प्रसारित होणाऱ्या अफवा व अप्रमाणित संदेशांवर विश्वास ठेवू नये, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
विदर्भ न्यूज 24 नेटवर्क | ब्रेकिंग न्यूज
सिरोंचा | अहेरी | गडचिरोली
