सिरोंचा सांस्कृतिक प्रतिनिधी दिनांक:- 11 एप्रिल 2025
गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील कारसपल्ली (क्लि.) गावातील नागरिकांनी गावात गेल्या 25 वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या श्रीराम मंदिरासाठी अधिकृत जागा मंजुरीची मागणी करत शासनाकडे निवेदन सादर केले आहे. प्रस्तावित श्रीराम मंदिर सेवा समिती, नारायणपूर यांच्या माध्यमातून सादर करण्यात आलेल्या या निवेदनात ग्रामस्थांनी भु.क्र. 205 पैकी 0.32 हेक्टर जागा मंदिर व समाज मंदिर बांधकामासाठी कायमस्वरूपी उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे.
सदर जागा सध्या वन विभागाच्या नावावर असून, प्रत्यक्षात त्या जागेवर कोणतेही वनक्षेत्र अथवा झाडीझुडप नाही. उलट, या ठिकाणी अनेक वर्षांपासून ग्रामस्थ शांततेत धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करत आले आहेत. सन 2001 साली गावातील नागरिकांनी एकत्र येऊन सदर जागेवर श्रीराम, लक्ष्मण, सीता आणि हनुमान यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून सार्वजनिक मंदिर स्थापन केले.
या मंदिरात दरवर्षी रामनवमी, हनुमान जयंतीसारखे उत्सव मोठ्या श्रद्धेने साजरे केले जातात. हजारोंच्या संख्येने ग्रामस्थ भजन, कीर्तन, पूजा, होमहवन व अन्नदान करत असतात. त्यामुळे हे मंदिर केवळ धार्मिक नव्हे, तर सामाजिक ऐक्याचे व व्यसनमुक्तीच्या जनजागृतीचे केंद्र बनले आहे.
ग्रामपंचायत नारायणपूरने देखील या जागेवर राममंदिर व समाज मंदिर बांधकामासाठी उराव मंजूर करून नाहरकत प्रमाणपत्र दिले आहे. तसेच या जागेसंदर्भात दिनांक 07/06/2022 रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते, परंतु अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. दरम्यान, शासनामार्फत समाज मंदिरासाठी निधी मंजूर झाला असून गावकरी बांधकामास सुरुवात करू इच्छित आहेत. मात्र वन विभागाकडून जागा रिकामी करण्याबाबत चेतावणी दिली जात आहे, ज्यामुळे ग्रामस्थांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.
या संदर्भात गावकऱ्यांनी मा. पालकमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्हाधिकारी गडचिरोली, उपवनसंरक्षक व वन परिक्षेत्र अधिकारी यांच्याकडे निवेदन सादर केले असून, सदर जागा मंदिरासाठी कायमस्वरूपी हस्तांतरित करण्याची मागणी केली आहे.
प्रतिनिधींचे म्हणणे :
“या मंदिरामुळे गावात व्यसनमुक्ती आणि धार्मिक एकता नांदत आहे. देवाची प्राणप्रतिष्ठित मूर्ती पाडण्याचा विचारही आमच्यासाठी दु:खदायक आणि अनिष्ट आहे,” असे समितीचे अध्यक्ष व ग्रामस्थांनी सांगितले.
—जोडपत्र :1. 7/12 उतारा 2. ग्रामपंचायतीचे ठराव
3. पूर्वी दिलेले निवेदनाचे प्रती
4. समाज मंदिरासाठी निधी मंजूरीची माहिती