चामोर्शी जिल्हा प्रतिनिधी दिनांक:- 17 एप्रिल 2025
तालुक्यातील घोट पोलिस मदत केंद्राच्या हद्दी अंतर्गत सुभाषग्राम – घोट मार्गावरील ठाकूरनगर पहाडीजवळ भरधाव दुचाकी अनियंत्रित होवून झाडाला धडक बसल्याने दुचाकी वरील तिघांचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक 17 एप्रिल गुरुवारी सकाळी साडे नऊ ते दहा वाजताच्या सुमारास घडली. झाडाला धडक बसल्याने दुचाकी ही जळून खाक झाली. मृतात दोन सख्ख्या भावाचा समावेश आहे.
साहेब सुभाशिष चक्रवर्ती, वय 16 वर्षे,
रा. वसंतपुर, तालुका चामोर्शी
सौरभ सुभाशिष चक्रवर्ती, वय 20 वर्षे, रा. वसंतपुर
विशाल भुपाल बच्छाड, वय 19 वर्षे, रा. 10 नंबर, शिरपूर, तेलंगणा. अशी मृतांची नावे आहेत
सविस्तर वृत्त असे की, वसंतपुर येथील साहेब चक्रवर्ती, सौरभ चक्रवर्ती या दोन भावंडासह त्यांचा तेलंगणा येथील येथील नातेवाईक विशाल बाछाड हे तिघे जण वसंतपूर येथून घोट कडे दुचाकीने जात असताना ठाकूरनगर पहाडी जवळील वळणाजवळ भरधाव दुचाकी अनियंत्रित झाली व थेट सागवान झाडाला आदळली. या धडकेत तिघांचाही जागीच मृत्यू झाला. दुचाकी ही जळून खाक झाली. विशाल बाछाड हा दुचाकी चालवत असल्याचे समजते.घटनेची माहिती मिळताच घोट पोलिस मदत केंद्राचे पोलिस निरीक्षक नितेश गोहणे यांच्या पथकासह घटना स्थळी दाखल झाले. मृतदेह चामोर्शी येथील ग्रामीण रुग्णालय शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. घटनेचा पुढील तपास घोट पोलिस ठाण्याचे प्रभारी ठाणेदार नितेश गोहणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.