सिरोंचा तालुक्यात पूरस्थितीची शक्यता – तहसील प्रशासनाचा इशारा….
कडडम व श्रीपदा येलमपल्ली प्रकल्पातून वाढता विसर्ग; गोदावरी–प्राणहिता नदीला मोठ्या प्रमाणात पूरस्थितीची शक्यता

सिरोंचा विशेष प्रतिनिधी दिनांक:-16/08/2025
भारतीय हवामान विभागाने पुढील 1 ते 2 दिवसांत अतिवृष्टी होण्याचा अंदाज व्यक्त केला असून मध्य गोदावरी उपखोऱ्यातील प्रचंड पावसामुळे तेलंगणा राज्यातील कड़डम प्रकल्प तसेच श्रीपदा येलमपल्ली प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावर पाणी विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सद्यस्थितीत विसर्गामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता असून गडचिरोली जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांसाठी हा गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.
ताज्या अहवालानुसार, वर्धा, वैनगंगा व प्राणहिता नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात सतत व मुसळधार पावसामुळे पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. उर्ध्व भागातून येणारा पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने पुढील 15 ते 20 तासांत मेडिगड्डा बॅरेजवरील विसर्ग 5 ते 7 लाख क्यूसेक्सपर्यंत पोहोचण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.
या परिस्थितीत सिरोंचा तालुक्यातील नदीकाठच्या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण होऊ शकते. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तहसीलदार निलेश होनमोरे यांनी महसूल, पोलीस, ग्रामपंचायत व इतर शासकीय यंत्रणांना सतर्कतेचे निर्देश दिले आहेत. तसेच नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
तहसीलदार निलेश होनमोरे यांनी जारी केलेल्या अधिकृत पत्रामध्ये जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी अहेरी, उपविभागीय अधिकारी तसेच जिल्हा माहिती कार्यालय गडचिरोली यांना सविनय प्रतिलिपी पाठविण्यात आली असून सर्व विभाग प्रमुखांना तातडीने आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवून आवश्यक उपाययोजना सुरू केल्या आहेत. दरम्यान, नदीकाठच्या नागरिकांना स्थलांतराची आवश्यकता भासल्यास संबंधित विभागाच्या मदतीने सुरक्षित स्थळी हलविण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
— विदर्भ न्यूज 24 सतत आपल्या वाचकांना या पूरस्थितीबाबत अद्ययावत माहिती देत राहील.