# ‘संपूर्णता’ अभियानात गडचिरोली जिल्ह्याची राज्यस्तरीय कामगिरी; जिल्हा व दोन तालुक्यांना ‘ब्रॉंझ’ पदकाने सन्मान….. – VIDARBHANEWS 24
आपला जिल्हा

‘संपूर्णता’ अभियानात गडचिरोली जिल्ह्याची राज्यस्तरीय कामगिरी; जिल्हा व दोन तालुक्यांना ‘ब्रॉंझ’ पदकाने सन्मान…..

Amazon.in/ONLINE SHOPPING

गडचिरोली विशेष प्रतिनिधी दिनांक:-04 ऑगस्ट 2025

गडचिरोली – विकासाच्या शर्यतीत मागे पडलेले भाग आता प्रगतीच्या दिशेने ठामपणे पावले टाकत आहेत, याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे गडचिरोली जिल्ह्याने ‘संपूर्णता’ अभियानात मिळवलेला ‘ब्रॉंझ’ सन्मान. नीती आयोगाच्या आकांक्षित जिल्हा विकास कार्यक्रमांतर्गत राबविण्यात आलेल्या ‘संपूर्णता अभियानात’ गडचिरोली जिल्ह्याने विविध मानकांमध्ये उल्लेखनीय प्रगती साधली आहे. त्यामुळे जिल्ह्यासह अहेरी आणि भामरागड तालुक्यांना देखील ‘ब्रॉंझ’ पदकाने गौरविण्यात आले.

-राज्यस्तरीय महसूल परिषदेत दिला सन्मान

 दिनांक २ व ३ ऑगस्ट २०२५ रोजी आयआयएम नागपूर येथे आयोजित महसूल परिषदेच्या विशेष सत्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला. याप्रसंगी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार, अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, मुख्यमंत्री यांचे सचिव श्रीकर परदेशी, तसेच राज्यातील सर्व विभागीय आयुक्त आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्याकडे या सन्मानाचे प्रतीकस्वरूप ‘ब्रॉंझ’ पदक सुपूर्द करण्यात आले. त्यांनी आपल्या प्रशासनाच्या व सर्व शासकीय यंत्रणांच्या समन्वित प्रयत्नांमुळे हा गौरव शक्य झाल्याचे सांगितले.

–कसोटीवर उतरले गडचिरोली: आरोग्य, शिक्षण, पोषण, कृषी क्षेत्रात उजवा ठसा

‘संपूर्णता’ अभियान हे नीती आयोगाचा एक महत्वाकांक्षी उपक्रम असून, यामध्ये देशातील मागासलेल्या जिल्ह्यांमध्ये समन्वयात्मक पद्धतीने सर्वांगीण विकास घडविणे हे ध्येय आहे. गडचिरोली जिल्ह्याने या मोहिमेत खालील बाबींमध्ये उल्लेखनीय यश मिळवले:

९ ते ११ वयोगटातील बालकांचे १००% लसीकरण

शाळांमध्ये १००% विद्युत सुविधा उपलब्ध करणे

शालेय वर्षाच्या सुरुवातीस एक महिन्याच्या आत १००% पाठ्यपुस्तके वितरीत करणे

–अहेरी व भामरागड तालुक्यांची स्वतंत्र ओळख निर्माण

गडचिरोली जिल्ह्याच्या उपतालुक्यांनीही स्वतंत्रपणे या अभियानात आपली ठसा उमटवला:

अहेरी तालुका:

मधुमेह व उच्च रक्तदाब तपासणी मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण

गरोदर महिलांना पूरक पोषण आहार वितरणात १००% उद्दिष्टपूर्ती

शेतीसाठी माती परीक्षण आणि मृदा आरोग्य पत्रिका वाटप

भामरागड तालुका:

नियमित मधुमेह व रक्तदाब तपासणी शिबिरांची अंमलबजावणी

स्वयंसहायता बचत गटांना खेळते भांडवल उपलब्ध करून देणे

या दोन्ही तालुक्यांनी समाजाच्या विविध घटकांपर्यंत योजनांची पोहोच सुनिश्चित करून शासनाच्या उद्दिष्टांना यशस्वीपणे पूर्ण केले आहे.

-एकात्मिक यंत्रणा व सक्रिय नेतृत्वाची फलश्रुती

या यशामागे जिल्हा प्रशासनाचे नियोजनबद्ध कार्य, प्रत्येक तालुकास्तरावरील यंत्रणांची चोख अंमलबजावणी आणि शासकीय योजनेतील लोकसहभागाचा महत्त्वाचा वाटा आहे. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य, शिक्षण, महिला बालकल्याण, कृषी, ग्रामविकास अशा अनेक विभागांनी संयुक्तरित्या कार्य करून ‘संपूर्णता’ अभियानाचे उद्दिष्ट वास्तवात उतरवले.

—नव्या उंचीच्या दिशेने गडचिरोली

          ‘ब्रॉंझ’ पदक ही केवळ एक प्रशस्तीपत्र नाही, तर गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त व दुर्गम भागासाठी एक प्रेरणादायी टप्पा आहे. राज्य शासनाच्या विविध योजनांचा अचूक अंमल, कार्यसंस्कृतीतील सकारात्मक बदल आणि प्रशासन–जनतेमधील संवाद या त्रिसूत्रीवर जिल्ह्याचा विकास आरूढ होतो आहे.

प्रतिनिधी: विदर्भ न्यूज 24 | गडचिरोली
संपर्क: editor@vidarbhanews24.in

संपादक – विदर्भ न्यूज 24
www.vidarbhanews24.com

Sandeep Racharlawar

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker