गडचिरोली पोलिसांचे मोठे यश ताडगाव जंगल परिसरातून जहाल माओवादी शंकर भिमा महाका अटकेत…

गडचिरोली विदर्भ न्यूज 24 नेटवर्क दिनांक :-14/09/2025
गडचिरोली जिल्ह्यातील ताडगाव जंगल परिसरातून घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने रेकी करणाऱ्या जहाल माओवादी शंकर भिमा महाका (वय 32, रा. परायनार, भामरागड, जि. गडचिरोली) यास गडचिरोली पोलिसांनी अटक केली आहे. भामरागड दलमचा सक्रिय सदस्य असलेल्या या माओवादीवर खून, जाळपोळ व विध्वंसक कारवायांचे एकूण चार गुन्हे दाखल असून महाराष्ट्र शासनाने त्याच्या अटकेवर दोन लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
- घटनेचा तपशील
दि. 13 सप्टेंबर रोजी भामरागड उपविभागातील तिरकामेटा जंगल परिसरात विशेष अभियान पथकाची दोन तुकडी माओवादीविरोधी मोहीम राबवत असताना, त्यांना एक संशयित व्यक्ती फिरताना आढळून आली. जवानांनी त्याला ताब्यात घेऊन प्राणहिता उप-मुख्यालयात चौकशी केली असता त्याची ओळख शंकर भिमा महाका (सदस्य, भामरागड दलम) अशी पटली.
शंकर महाका हा पोलीस अभिलेखावरील जहाल माओवादी असून घातपाताच्या उद्देशाने तो जंगल परिसरात रेकीसाठी आला होता.
नोंदवलेले गुन्हे
जाळपोळ (2022) – धोडराज–ईरपनार मार्गावरील पेनगुंडा रस्त्याच्या कामावरील 19 वाहने (मूल्य अंदाजे 2 कोटी) जाळण्याच्या घटनेत सहभाग.
खून (2023) – मौजा पेनगुंडा येथील एका निरपराध इसमाच्या खूनात प्रत्यक्ष सहभाग.
इतर 2 गुन्हे – विविध विध्वंसक कारवाया.
दलममधील कार्यकाळ
2016–2021-22 : जनमिलीशिया सदस्य म्हणून सक्रिय.
2021-22 पासून पुढे : भामरागड दलममध्ये सदस्य पदावर भरती.
पोलिसांची माहिती गोळा करणे, तसेच गरजेनुसार दलमसोबत राहून हिंसक कारवायांत सहभाग.
अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन व कारवाई
ही कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) श्री. संदीप पाटील, पोलीस उप-महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र श्री. अंकित गोयल, पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक अहेरी (प्राणहिता) श्री. सत्य साई कार्तिक, उप-अधीक्षक (अभियान) श्री. विशाल नागरगोजे व प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड श्री. अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
- पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी या अटकेनंतर सांगितले की, “गडचिरोली पोलिसांचे माओवादीविरोधी अभियान आणखी तीव्र केले जाणार आहे. माओवादी युवकांनी हिंसेचा मार्ग सोडून आत्मसमर्पण करावे व समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होऊन सन्मानाने जीवन जगावे.”
पार्श्वभूमी
जानेवारी 2022 पासून आतापर्यंत गडचिरोली पोलिसांनी एकूण 109 माओवाद्यांना अटक केली आहे. या सातत्यपूर्ण कारवाईमुळे माओवादी संघटनांवर मोठा दबाव निर्माण झाला असून जिल्ह्यातील माओवादी हालचालींना मोठा धक्का बसला आहे.
—✍ विदर्भ न्यूज 24