पत्नीचा खून केल्या प्रकरणी पतीस जन्मठेपेची शिक्षा…

गडचिरोली विशेष प्रतिनिधी दिनांक :–28/08/2025 मौजा जपतलाई (कोवानटोला), ता. धानोरा येथील पत्नीचा खून केल्या प्रकरणी पतीस गडचिरोली न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. विनायक आर. जोशी यांनी दिलेल्या या ऐतिहासिक निर्णयात आरोपीस जन्मठेपेसह 5,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून, दंड न भरल्यास अतिरिक्त सहा महिन्यांच्या कारावासाची तरतूद करण्यात आली आहे. हा निकाल दिनांक 26 ऑगस्ट 2025 रोजी घोषित करण्यात आला.
घटनेचा तपशील
जपतलाई (कोवानटोला) येथील परसराम धानुजी कुमरे (वय 48 वर्ष) याला आपल्या पत्नी मिराबाई परसराम कुमरे (वय 37 वर्ष) हिच्या चारित्र्यावर संशय होता. यावरून वारंवार पती-पत्नीमध्ये वाद होत होते. दिनांक 4 ऑक्टोबर 2022 रोजी मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास झालेल्या भांडणात संतापलेल्या परसरामने खलबत्याच्या लोखंडी मुसळाने तसेच चाकूने पत्नीच्या डोक्यावर वार करून तिचा निर्घृण खून केला.
या घटनेनंतर आरोपीच्या बहिणी आशाबाई रावजी पोटावी यांनी धानोरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी परसराम कुमरे याला त्याच दिवशी अटक केली.
तपास व खटल्याची कार्यवाही
सदर प्रकरणाचा तपास पोलीस मदत केंद्र, येरकड येथील उपनिरीक्षक आकाश ठाकरे यांनी केला. त्यांनी सबळ पुरावे गोळा करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान फिर्यादी, पंच व साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले. सरकारी पक्षाचा युक्तिवादही न्यायालयाने ग्राह्य धरला. अखेर आरोपी परसराम कुमरे यास भारतीय दंड संहिता कलम 302 अंतर्गत दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.
या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे सहा. जिल्हा सरकारी वकिल श्री. सचिन कुंभारे यांनी पैरवी केली. खटला सुरळीत पार पाडण्यासाठी कोर्ट पैरवी अधिकारी पोनि चंद्रकांत वाबळे, श्रेणी पोउपनि शंकर चौधरी, श्रेणी पोउपनि भैयाजी जंगटे, मपोहवा जिजा कुसनाके, मपोहवा मिनाक्षी पोरेड्डीवार, पोशि जिवन कुमरे व मपोशि छाया शेट्टीवार यांनी समन्वय साधला.
न्यायालयाचा संदेश
पती-पत्नीतील वाद अंगाशी येऊन जीवघेण्या स्वरूपात होऊ नयेत, यासाठी या निर्णयाने समाजात कठोर संदेश दिला असल्याचे मानले जात आहे. न्यायालयाने दिलेली जन्मठेप शिक्षा महिलांवरील कौटुंबिक हिंसाचार व पती-पत्नीतील वादातून घडणाऱ्या गुन्ह्यांविरुद्ध कडक भूमिका दर्शवणारी ठरली आहे.