औषध निरीक्षक पदांसाठी ऐतिहासिक भरती जाहीर; ‘अनुभवाची अट’ अखेर रद्द!
हजारो फार्मसी पदवीधारक विद्यार्थ्यांना दिलासा; महाराष्ट्र फार्मसी फोरमचा निर्णायक लढा यशस्वी

नागपूर विदर्भ न्यूज 24 नेटवर्क
दिनांक:-02 ऑगस्ट 2025
– महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC) औषध निरीक्षक पदांसाठी अखेर १०९ जागांची बहुप्रतीक्षित भरती जाहीर करण्यात आली असून, यावेळी अनुभवाची अट पूर्णतः रद्द करण्यात आल्याने राज्यभरातील नवोदित फार्मसी पदवीधारक उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
या भरतीसाठी २०२० पासूनची प्रक्रिया रखडलेली होती. मात्र तीन वर्षांच्या संघर्षानंतर महाराष्ट्र फार्मसी फोरमच्या प्रयत्नांना यश आलं असून, यामध्ये फार्मसी फोरमचे संचालक आदित्य वगरे यांचे मोलाचे योगदान ठरले. त्यांनी शासन, मंत्रालय आणि आयोग यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून ‘अनुभव’ या अटीचा निषेध केला होता.
> “अनुभवाची अट चुकीची असल्याचे आम्ही तर्कसंगतपणे सप्रमाण सादर केले. हजारो विद्यार्थ्यांच्या नोकरीच्या संधी या अटीमुळे वाया जात होत्या. अखेर लोकशाही मार्गाने संघर्ष करून आम्ही ही अट रद्द करवली – हीच खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांच्या आवाजाची विजयगाथा आहे,”
असे उद्गार वगरे यांनी व्यक्त केले.
या भरतीमुळे औषधांच्या गुणवत्तेवर देखरेख ठेवणाऱ्या यंत्रणेत नवचैतन्य निर्माण होणार असून, ही महाराष्ट्रातील आतापर्यंतची सर्वात मोठी औषध निरीक्षक भरती असल्याचे सांगण्यात येते.
औषध निरीक्षक पदाचे कार्यक्षेत्र:
हे पद अत्यंत संवेदनशील असून, औषधनिर्मिती, वितरण, विक्री आणि साठवणुकीवर कायदेशीर देखरेख ठेवणे ही यामधील प्रमुख जबाबदारी आहे. यामुळे राज्याची औषध नियंत्रण व्यवस्था अधिक सक्षम आणि पारदर्शक होण्यास मदत होणार आहे.
भरती प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची शक्यता
या भरतीचा अधिकृत तपशील एमपीएससीच्या संकेतस्थळावर लवकरच प्रसिद्ध होणार असून, इच्छुक उमेदवारांना तयारीला लागण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
–-वार्ताहर – विदर्भ न्यूज 24
✍ संपादक – विदर्भ न्यूज 24
www.vidarbhanews24.com