गडचिरोली पोलीस दलाकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी सहायक उपकरणे तपासणी शिबिर
अतिदुर्गम भागातील 1300 ज्येष्ठांची नोंदणी, 207 जणांना विविध शासकीय योजनांचा प्रत्यक्ष लाभ

गडचिरोली, दि. 12 (विदर्भ न्यूज 24) :
जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांचे जीवनमान अधिक सुलभ, गुणवत्तापूर्ण आणि सुरक्षित करण्याच्या हेतूने गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने दोन दिवसीय सहायक उपकरणे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. भारत सरकारच्या राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत ‘भारत कृत्रिम अंग निर्माण निगम’ (एलिम्को), मुंबई यांच्या सहकार्याने हे शिबिर गडचिरोली येथे 11 सप्टेंबर रोजी एकलव्य हॉल, पोलीस मुख्यालयात तर 12 सप्टेंबर रोजी प्राणहिता येथील पोलीस उपमुख्यालयात पार पडले.
1300 ज्येष्ठांची नोंदणी
या शिबिरादरम्यान उत्तर विभागातील 850 व दक्षिण विभागातील 450 असे एकूण 1300 ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करण्यात आली. वैद्यकीय पथकाने वयोमानानुसार उद्भवणाऱ्या शारीरिक अडचणींची तपासणी करून ज्येष्ठांना आवश्यक सहायक उपकरणांचे वाटप करण्याचा निर्णय घेतला. यात व्हीलचेअर, चालण्याची काठी, वॉकर, श्रवणयंत्र, कुबडी, कमरेचा पट्टा आदी उपकरणांचा समावेश असून त्यांचे मोफत वितरण करण्यात येणार आहे.
207 जणांना शासकीय योजनांचा लाभ
शिबिरादरम्यान 207 ज्येष्ठ नागरिकांना थेट शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यात आला. यामध्ये संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना, आयुष्यमान भारत कार्ड आणि ज्येष्ठ नागरिक कार्ड या योजनांचा समावेश होता.
“ज्येष्ठांचे जीवनमान उंचावेल” – पोलीस अधीक्षक नीलोत्पल
ज्येष्ठांना संबोधित करताना पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांनी सांगितले की, “विविध सहायक उपकरणांचे वाटप केल्याने ज्येष्ठ नागरिकांच्या दैनंदिन जीवनाला एक नवी सुरुवात मिळेल. दुर्गम व अतिदुर्गम भागातील प्रत्येक ज्येष्ठापर्यंत राष्ट्रीय वयोश्री योजनेचा लाभ पोहोचविण्यासाठी गडचिरोली पोलीस दल कटिबद्ध आहे. तसेच ज्येष्ठांच्या छोट्या-छोट्या समस्या सोडविण्यासाठीही पोलीस नेहमीच तत्पर राहतील.”
मान्यवरांची उपस्थिती
या शिबिरात पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री. सत्य साई कार्तिक, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अजय कोकाटे, पोलीस रुग्णालय गडचिरोलीचे मुख्य वैद्यकीय अधिकारी श्री. सुनिल मडावी, जिल्हा सामान्य रुग्णालयातील ऑडीओलॉजीस्ट डॉ. संदिप मोटघरे, एलिम्को मुंबईचे डॉ. संकेत डेरवणकर, श्री. हर्ष विश्रवकर्मा व श्री. विकास कुमार आदी मान्यवर उपस्थित होते.
शिबिर यशस्वी करण्यासाठी पोलीस दलाचे योगदान
या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, विविध पोलीस ठाणे/उपपोस्टांचे अधिकारी व अंमलदार, तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी पोउपनि. चंद्रकांत शेळके आणि पोलीस अंमलदार यांनी मोलाचे योगदान दिले.
—
✍ संपादक – विदर्भ न्यूज 24
www.vidarbhanews24.com