उपजिल्हा रुग्णालय अहेरीचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कन्ना मडावी यांच्या मातोश्रींचे निधन
बातमीदक्षिण गडचिरोलीवर शोककळा

अहेरी दिनांक.28 ऑक्टोबर 2025 विदर्भ न्यूज 24 – विशेष बातमी
दक्षिण गडचिरोली जिल्ह्याच्या आरोग्य सेवेत उल्लेखनीय योगदान देणारे उपजिल्हा रुग्णालय अहेरीचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कन्ना मडावी यांच्या मातोश्री रुकोबाई डोबी मडावी (वय 95) यांचे वृद्धापकाळातील आजाराने मंगळवार, दि. 28 ऑक्टोबर 2025 रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने मडावी कुटुंबावर शोककळा पसरली असून अहेरीसह संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
कर्तृत्ववान डॉक्टर घडवणाऱ्या मातेचा निरोप
रुकोबाई मडावी यांनी आपल्या संस्कारांनी समाजोपयोगी व्यक्ती घडवली — त्या म्हणजे डॉ. कन्ना मडावी. आरोग्य क्षेत्रातील सेवेला सर्वोच्च मान देणाऱ्या या पुत्राच्या यशामागे त्यांची प्रेरणा, त्याग आणि ममतेचा मोठा वाटा होता. त्यामुळेच त्यांच्या जाण्याने परिसरात “मातृवात्सल्याचे छत्र हरपल्याची” भावना व्यक्त केली जात आहे.
माजी पालकमंत्र्यांकडून संवेदना — तातडीने दाखल होऊन श्रद्धांजली
ही दुःखद वार्ता समजताच अहेरी इस्टेटचे श्रीमंत राजे, माजी राज्यमंत्री आणि गडचिरोलीचे माजी पालकमंत्री राजे अंबरीशराव आत्राम यांनी डॉ. कन्ना मडावी यांच्या निवासस्थानी धाव घेतली. दिवंगत मातोश्रींच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेऊन त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी त्यांनी अत्यंत भावपूर्ण शब्दांत संवेदना व्यक्त करत,
“मडावी कुटुंबावर कोसळलेला हा दुःखाचा डोंगर फार मोठा आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो,”
असे म्हणत कुटुंबियांना धीर दिला.
त्याचबरोबर गडचिरोलीचे माजी आमदार व प्रदेश उपाध्यक्ष डॉ. देवराव होळी यांनीही अंतिम दर्शन घेत कुटुंबियांना सांत्वन केले. समाजातील अनेक मान्यवरांनी दूरध्वनीद्वारे व प्रत्यक्ष येऊन श्रद्धांजली वाहिली. उपस्थितांमध्ये कुमार अवधेशराव बाबा आत्राम यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती.
(शोकसंदेश
“रुकोबाई डोबी मडावी यांनी आपल्या मुलामार्फत वैद्यकीय सेवेच्या रूपाने समाजात मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या निधनाने आम्ही एक समाजप्रेरक माता गमावली आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.”
– राजे अंबरीशराव आत्राम, माजी राज्यमंत्री
–—संपूर्ण जिल्हा शोकमग्न
दक्षिण गडचिरोलीतील सामाजिक, राजकीय, आरोग्य आणि शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींनी रुकोबाईंच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत, मडावी कुटुंबियांना शोक सहन करण्याची शक्ती मिळावी, अशी प्रार्थना केली आहे.
✍ संपादक – विदर्भ न्यूज 24
www.vidarbhanews24.com



