सिरोंचा पोलिसांची धडाकेबाज कारवाई – गोवंश तस्करीचा ट्रक पकडला, 14.70 लाखांचा मुद्देमाल जप्त
गुप्त माहितीवर सापळा – रात्री उशिरा कारवाई,47 गोवंश ताब्यात, ट्रक चालक अटक,गोवंशाचे सुरक्षित स्थळी स्थलांतर,गडचिरोली पोलिसांचे धाडसी पाऊल..,

सिरोंचा विशेष प्रतिनिधी दिनांक 11 ऑगस्ट 2025
सिरोंचा पोलिसांनी गोवंश तस्करीविरोधात मोठी कारवाई करत 14 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, 47 गायी व बैलांना कत्तलीच्या मार्गावरून वाचवण्यात आले आहे. 9 ऑगस्ट 2025 रोजी रात्री सुमारे 11 वाजताच्या सुमारास सिरोंचा पोलीस स्टेशन व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली की, एका मोठ्या ट्रकमधून गोवंश जातीचे जनावरे कत्तलीसाठी नेण्यात येत आहेत. ही माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने सापळा रचण्यात आला.
मा. नीलोत्पल, पोलीस अधीक्षक गडचिरोली, मा. एम. रमेश, अप्पर पोलीस अधीक्षक अभियान, मा. गोकुल राज, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशासन आणि मा. सत्यसाई कार्तिक, अप्पर पोलीस अधीक्षक अहेरी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मा. संदेश नाईक, उपविभागीय पोलीस अधिकारी सिरोंचा यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक निखिल फटिंग यांच्या पथकाने ट्रक थांबवून तपास केला असता त्यात 47 गायी व बैल आढळले. पोलिसांनी त्वरित ट्रक जप्त करून गोवंश व वाहन असा मिळून 14 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. ट्रक चालकाला अटक करून त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र प्राणी छळवणूक प्रतिबंधक कायदा तसेच प्राणी संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंदवला गेला. पकडण्यात आलेले सर्व गोवंश चंद्रपूर येथील प्यार फाउंडेशनमध्ये सुरक्षित ठेवण्यात आले असून, तेथे त्यांची देखभाल व उपचार करण्यात येत आहेत.
ही कारवाई अत्यंत काटेकोर नियोजन व जलद अंमलबजावणीमुळे शक्य झाली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सोनवणे करीत आहेत. या धाडसी पावलामुळे गोवंश तस्करीच्या साखळीला मोठा धक्का बसला असून, स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक केले आहे.