महामार्गावरील खड्डे बुजवा; अन्यथा खड्ड्यात वृक्षारोपणाचा इशारा आलापल्ली–सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग खड्ड्यात; नागरिक त्रस्त, संतोष ताटीकोंडावार यांचा इशारा

गडचिरोली विदर्भ न्यूज 24नेटवर्क दिनांक:-10 ऑक्टोंबर 2025
आलापल्ली–सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 353 सीचे काम मागील तीन वर्षांपासून कासवगतीने सुरू आहे. कामातील विलंब, पावसाळ्यातील पाणी साठणे आणि देखभालीचा अभाव यामुळे या मार्गावरील रस्त्यांची दुरवस्था झाली असून, ठिकठिकाणी पडलेल्या प्रचंड खड्ड्यांनी महामार्गाला अक्षरश: डबक्यांचे स्वरूप दिले आहे. या खड्ड्यांतून वाहन हाकणे म्हणजे वाहनधारकांसाठी रोजची कसरत झाली असून, अपघाताची भीती सतत डोळ्यासमोर आहे.
पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच रेपनपल्ली–उमानूर–सिरोंचा या मार्गाचा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे. अवजड वाहनांच्या सततच्या वर्दळीने रस्त्याची चाळण झाली आहे. पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचले असल्याने वाहनचालकांना खड्ड्यांची खोली ओळखता येत नाही आणि त्यामुळे अचानक धक्के बसून वाहने घसरतात. अनेकदा दुचाकीस्वार रस्त्यावर कोसळतात, तर हलक्या वाहनांचे अंडरबॉडी आणि टायर खराब होतात.
राष्ट्रीय महामार्ग 353 सी हा जिल्ह्याच्या दक्षिण भागातील महत्त्वाचा मार्ग आहे. हा रस्ता तेलंगणा, छत्तीसगड आणि आंध्रप्रदेशला थेट जोडतो. त्यामुळे या मार्गावर मालवाहतूक करणारी ट्रक, ट्रॅव्हल्स, खासगी गाड्या आणि दुचाकी यांचा सतत राबता असतो. तरीदेखील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभाग आणि कंत्राटदार यांनी काम वेळेत पूर्ण करण्याकडे गंभीरतेने लक्ष दिलेले नाही, अशी जनतेची नाराजी व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी “१५ ऑगस्टपर्यंत रेपनपल्ली–उमानूर–सिरोंचा मार्गावरील खड्ड्यांची दुरुस्ती झाली नाही, तर १८ ऑगस्ट रोजी नागरिकांना घेऊन खड्ड्यात वृक्षारोपण करून रास्तारोको आंदोलन करण्यात येईल” असा इशारा दिला आहे. त्यांनी पुढे सांगितले की, “दरवर्षी पावसाळा आला की हा महामार्ग खड्ड्यात जातो, अपघात होतात, जीव जातात; पण संबंधित विभाग वेळेवर दुरुस्ती करत नाही. यावर्षी मात्र आम्ही गप्प बसणार नाही.”
स्थानिक नागरिकांनाही या आंदोलनाची तयारी सुरू झाली आहे. काही तरुणांनी खड्ड्यात झाडे लावून त्यावर फलक उभारण्याचे प्रतिकात्मक नियोजन केले आहे, ज्यामुळे प्रशासनाचे लक्ष या गंभीर समस्येकडे वेधले जाईल.
रस्त्याच्या दुरुस्तीसाठी नेमलेले कंत्राटदार आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने अद्याप अधिकृत प्रतिसाद दिलेला नाही. मात्र, नागरिकांचा संयम आता सुटत चालल्याचे चित्र असून, आगामी काळात या प्रश्नावरून मोठ्या प्रमाणात जनआंदोलन पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही.
✍ संपादक – विदर्भ न्यूज 24
www.vidarbhanews24.com