गडचिरोलीत मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी प्रयत्न करणार – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा*
*मत्स्य संगोपन प्रात्यक्षिक प्रकल्पाचे उद्घाटन*

गडचिरोली विशेष प्रतिनिधी दिनांक:-05 ऑगस्ट 2025
गडचिरोली जिल्ह्यातील बोडी व मामा तलावांमध्ये जून ते फेब्रुवारी या कालावधीत मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध असते. या पाण्यातून ६ ते ८ महिने मत्स्यपालन करून शेतकऱ्यांना अतिरीक्त उत्पन्न मिळवणे शक्य आहे. जिल्ह्यातील मत्स्य व्यवसायासाठी ही एक मोठी संधी असून, यासाठी प्रत्येक तालुक्यात प्रयत्न केले जातील.”असे मत जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी व्यक्त केले.
कृषी विज्ञान केंद्र, सोनापूर-गडचिरोली आणि मत्स्य विभाग, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी बांधव, ग्रामीण युवक आणि महिलांना मत्स्य व्यवसायाचे कौशल्याधारित प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने मत्स्य संगोपन प्रात्यक्षिक प्रकल्पाचे उद्घाटन डॉ. शरद गडाख, कुलगुरू, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला व जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांच्या हस्ते काल पार पडले.
गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात मत्स्य व्यवसाय वाढीसाठी सर्व संबंधित विभागांमार्फत एकत्रितपणे प्रयत्न केले जातील. ग्रामीण भागातील शेतकरी, युवक आणि महिलांना उत्पन्नाचे पर्यायी साधन उपलब्ध करून देण्यासाठी मत्स्य व्यवसाय ही एक प्रभावी दिशा ठरू शकते, मत्स्य व्यवसाय, त्यातील तंत्रज्ञान, बाजारपेठ आणि उत्पन्नवाढीच्या दृष्टीने जिल्ह्यातील तलावांचा प्रभावी उपयोग करण्याचे जिल्हाधिकारी पंडा यांनी सांगितले.
हा प्रकल्प गडचिरोली जिल्ह्यातील मत्स्य व्यवसायासाठी एक प्रभावी दिशादर्शक ठरेल आणि शेतकऱ्यांसाठी नव्या उत्पन्नाचा स्रोत निर्माण करेल, असा विश्वास डॉ. शरद गडाख यांनी व्यक्त केला.
प्रकल्पांतर्गत २ हेक्टर तलावात रोहू, कतला व मृगळ या गोड्या पाण्यातील ६००० मत्स्यबीजाचे संगोपन सुरू करण्यात आले आहे. याच्या माध्यमातून कृषी विज्ञान केंद्रातर्फे प्रशिक्षण व प्रात्यक्षिकांची मालिका राबवली जाणार आहे.
उद्घाटनप्रसंगी डॉ. धनराज उंदीरवाडे (संचालक, विस्तार शिक्षण), डॉ. शामसुंदर माने (संचालक, संशोधन), डॉ. देवानंद पंभाई, डॉ. समिर डोंगरे (सहाय्यक आयुक्त, मत्स्य विभाग), श्रीमती प्रिती हिरळकर (जिल्हा कृषि अधिक्षक), श्री. धर्मेंद्र गिरीपुंजे, श्रीमती निलिमा पाटील, डॉ. विक्रम कदम, श्री. पुष्पक बोथीकर, श्री. सुचित लाकडे, डॉ. प्रितम चिरडे, श्री. नरेश बुध्देवार, श्री. दीपक चव्हाण, सुनिता थोटे, मोहीतकुमार गणविर, शशिकांत सलामे, अंकुश ठाकरे यांची उपस्थिती होती.