गडचिरोलीत भीषण चकमक : दोन महिला माओवादी ठार, ए.के. 47 व पिस्तूल जप्त
एटापल्ली तालुक्यातील मौजा मोडस्के जंगल परिसरात भीषण चकमक दोन महिला माओवादी ठार घटनास्थळावरून AK-47 रायफल, अत्याधुनिक पिस्तूल, जिवंत दारूगोळा आणि मोठ्या प्रमाणावर माओवादी साहित्य जप्त सी-60 च्या पाच पथकांनी अहेरीतून रवाना होऊन राबवले अभियान पोस्टे गट्टा जांबिया पथक व CRPF 191 बटालियन ई कंपनीकडून घेराबंदी माओवादी दबा धरून बसल्याची विश्वसनीय माहितीवरून कारवाई गोळीबारात पोलीस दलाचे प्रभावी प्रत्युत्तर परिसरात अद्याप शोधमोहीम सुरू मृत माओवादींची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू

गडचिरोली विदर्भ न्यूज 24 विशेष प्रतिनिधी दिनांक17 सप्टेंबर 2025
गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुका अंतर्गत येणाऱ्या मौजा मोडस्के जंगल परिसरात आज सकाळी पोलीस व नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन महिला माओवादी ठार पडल्या. घटनास्थळावरून पोलीस दलाने एक स्वयंचलित ए.के. 47 रायफल, एक अत्याधुनिक पिस्तूल, जिवंत दारूगोळा तसेच मोठ्या प्रमाणावर माओवादी साहित्य जप्त केले आहे.
अभियानाची पार्श्वभूमी
पोलीस दलास प्राप्त झालेल्या विश्वसनीय माहितीनुसार गट्टा दलमचे काही माओवादी मोडस्के जंगल परिसरात दबा धरून बसले असल्याचे समजले. तत्काळ अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री. सत्य साई कार्तिक यांच्या नेतृत्वाखाली सी-60 ची पाच पथके अहेरी येथून रवाना करण्यात आली.
याचदरम्यान पोस्टे गट्टा जांबिया पोलीस पथक आणि सीआरपीएफ 191 बटालियनच्या ई कंपनीकडून जंगल परिसराला चारही बाजूंनी घेराबंदी घालण्यात आली.
गोळीबार आणि प्रत्युत्तर
शोधमोहीम सुरू असताना माओवाद्यांनी अचानक पोलीस पथकावर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. मात्र सी-60 आणि सीआरपीएफच्या जवानांनीही धैर्याने व तत्परतेने प्रत्युत्तर दिले. काही वेळ सुरू असलेल्या गोळीबारानंतर माओवादी पळ काढण्यात यशस्वी झाले.
जप्ती व मृतदेहांची ओळख पटविण्याचे प्रयत्न
घटनास्थळावर सुरू असलेल्या तपासात आतापर्यंत दोन महिला माओवादी ठार आढळल्या असून त्यांची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शस्त्रसाठा, दारूगोळा आणि माओवादी साहित्याच्या जप्तीमुळे हा दल मोठ्या कारवायांच्या तयारीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अधिकृत माहितीची प्रतीक्षा
पोलीस दलाकडून माओवाद विरोधी अभियान अद्यापही सुरू असून परिसराची काटेकोर तपासणी व शोधमोहीम राबविली जात आहे. चकमकीचे सविस्तर वृत्त व अधिकृत तपशील लवकरच पत्रकार परिषदेतून कळविण्यात येणार आहे.