# राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा बिगुल… – VIDARBHANEWS 24
ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा बिगुल…

१५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल

मुंबई | प्रतिनिधी विदर्भ न्यूज 24 दिनांक:,15/12/2025

राज्यातील रखडलेल्या महानगरपालिका निवडणुकांचा अखेर संपूर्ण कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलाi असून, यामुळे राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. राज्य निवडणूक आयुक्तांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. त्यानुसार राज्यातील एकूण २९ महानगरपालिकांसाठी सार्वत्रिक निवडणुका घेण्यात येणार आहेत. यापैकी २७ महानगरपालिकांची मुदत आधीच संपलेली असून जालना व इचलकरंजी या दोन नवीन महानगरपालिकांचा समावेश आहे.

निवडणूक कार्यक्रमानुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया २३ ते ३० डिसेंबर २०२५ दरम्यान पार पडणार आहे. दाखल झालेल्या अर्जांची छाननी ३१ डिसेंबर रोजी होणार असून २ जानेवारी २०२६ रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असेल. ३ जानेवारी २०२६ रोजी अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करून निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे. प्रत्यक्ष मतदान १५ जानेवारी २०२६ रोजी होणार असून दुसऱ्याच दिवशी १६ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाणार आहे.

निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच संबंधित महानगरपालिका क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे. या कालावधीत आचारसंहिता लागू असलेल्या क्षेत्राबाहेर जरी कोणतीही निवडणूकविषयक घोषणा करण्यात आली, तरी ती आचारसंहितेच्या कक्षेत येणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. मात्र नैसर्गिक आपत्तीच्या काळात आवश्यक शासकीय कामकाजावर कोणताही अडथळा येणार नसल्याचेही आयोगाने सांगितले.

राज्यातील २९ महानगरपालिकांपैकी मुंबई महानगरपालिकेत एक प्रभाग एक सदस्य अशी रचना असून उर्वरित २८ महानगरपालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धत लागू राहणार आहे. त्यामुळे या २८ मनपांमध्ये मतदारांना एका वेळी तीन ते पाच उमेदवारांना मतदान करावे लागणार आहे. या निवडणुकांमध्ये एकूण २ हजार ८६९ जागांसाठी मतदान होणार असून त्यापैकी १ हजार ४४२ जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. अनुसूचित जातींसाठी ३४१, अनुसूचित जमातींसाठी ७७ तर इतर मागास प्रवर्ग व नामनिर्देशित मिळून ७४९ जागांचा समावेश आहे.

या निवडणुकांसाठी राज्यभरात सुमारे ३ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये पुरुष, महिला व इतर मतदारांचा समावेश असून राज्यात ४९ हजारांपेक्षा अधिक मतदान केंद्रे उभारण्यात येणार आहेत. मुंबई महानगरपालिकेतच तब्बल १० हजार १११ मतदान केंद्रे असणार आहेत. १ जुलै २०२५ रोजीची मतदार यादी या निवडणुकांसाठी ग्राह्य धरली जाणार आहे.

मतदान प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी निवडणूक आयोगाने तंत्रज्ञानाचा वापर वाढवला असून मताधिकार मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना स्वतःचे नाव व प्रभागाची माहिती पाहता येणार आहे. दुबार मतदार नोंद आढळल्यास संबंधितांकडून हमीपत्र लिहून घेतले जाणार असून मुंबई महानगरपालिकेत सुमारे ११ लाख दुबार मतदार नोंद असल्याची माहिती आयोगाने दिली आहे.

निवडणूक प्रक्रियेत उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या अटीही लागू करण्यात आल्या आहेत. उमेदवारी अर्ज केवळ ऑफलाईन पद्धतीनेच स्वीकारले जाणार असून जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास अर्ज सादर केल्याचा पुरावा द्यावा लागणार आहे. सहा महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यास निवड रद्द केली जाणार आहे.

मतदानासाठी प्रशासनाने मोठी यंत्रणा उभी केली असून २८९ रिटर्निंग ऑफिसर, ८७० सहाय्यक रिटर्निंग ऑफिसर आणि तब्बल १ लाख ९६ हजार ६०५ कर्मचारी या प्रक्रियेत सहभागी असणार आहेत. तान्ह्या बाळांच्या माता, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी विशेष सुविधा देण्यात येणार असून काही मतदान केंद्रांवर संपूर्ण महिला अधिकारी व कर्मचारी तैनात असणार आहेत. मतदान जनजागृतीसाठीही विविध उपक्रम राबवले जाणार आहेत.

निवडणूक काळात प्रचारावर कडक निर्बंध लागू करण्यात आले असून मतदानाच्या ४८ तास आधी प्रचार पूर्णपणे बंद राहणार आहे. तसेच मतदान संपल्यानंतर कोणतेही एक्झिट पोल किंवा माध्यम पोल प्रसिद्ध करण्यास मनाई करण्यात आली आहे.

महानगरपालिका निवडणुका या राज्याच्या राजकारणाची दिशा ठरवणाऱ्या मानल्या जात असल्याने आगामी काळात भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह सर्वच राजकीय पक्षांमध्ये तीव्र राजकीय लढत पाहायला मिळणार आहे. शहरी विकास, पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, करप्रणाली आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधांवर ही निवडणूक केंद्रित राहणार आहे.

राज्यातील महानगरपालिका निवडणुकांच्या प्रत्येक घडामोडीवर ‘विदर्भ न्यूज 24’ची करडी नजर कायम राहणार आहे.

मुख्य संपादक

संदीप राचर्लावार, मुख्य संपादक विदर्भ न्यूज 24 नेटवर्क

शेअर करा.

मुख्य संपादक

संदीप राचर्लावार, मुख्य संपादक विदर्भ न्यूज 24 नेटवर्क

Related Articles

Back to top button
Don`t copy text!