‘त्या’ भ्रष्ट अधिकाऱ्याचे निलंबन नव्हे, बडतर्फीच करा – संतोष ताटीकोंडावार यांची मागणी
बांधकाम विभागातील प्रचंड भ्रष्टाचाराची लवकरच पोलखोल गडचिरोली जिल्ह्यातील इतरही भ्रष्ट अधिकारी लवकरच लोकांसमोर – संतोष ताटीकोंडावार
गडचिरोली विशेष प्रतिनिधी दिनांक :-02 ऑगस्ट 2025
गडचिरोली जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागातील चामोर्शी उपविभागाचे उपविभागीय अभियंता देवानंद सोनटक्के यांच्याविरोधात नागपूरमधील मनीषनगर भागातील एका मद्यालयात ‘महाराष्ट्र शासन’ असे लिहिलेल्या शासकीय फाईल्सवर मद्यधुंद अवस्थेत स्वाक्षऱ्या केल्याचे गंभीर प्रकरण समोर आल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणानंतर संबंधित अधिकाऱ्याचे तात्काळ निलंबन करण्यात आले असले तरी, केवळ निलंबन पुरेसे नसून त्याला सेवेतूनच बडतर्फ करण्यात यावे, अशी जोरदार मागणी जनकल्याण समाजोन्नती अन्याय भ्रष्टाचार निवारण समितीचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष संतोष ताटीकोंडावार यांनी केली आहे.
ताटीकोंडावार यांनी स्पष्टपणे सांगितले की, “सोनटक्के यांनी आपल्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला असून कोट्यवधी रुपयांची माया जमवली आहे. त्यांनी आपल्या नातेवाईकांच्या नावे देयके उचलत पदाचा दुरुपयोग केला आहे, अशी माहिती देखील समोर येत आहे. त्यामुळे अशा अधिकाऱ्याविरोधात केवळ निलंबन करून भागणार नाही, तर त्याच्या संपूर्ण सेवाकार्याची चौकशी करून त्याला सेवेतून बडतर्फ करावे.”
तसेच त्यांनी असेही सांगितले की, “बांधकाम विभागात सोनटक्के यांनी जिथे जिथे कामे केली आहेत त्या सर्व ठिकाणच्या कामांची गुणवत्ता तपासली जावी. कारण या अधिकाऱ्यामुळे जिल्ह्यातील विकासकामांना अडथळा निर्माण झाला असून अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाची कामे झाली आहेत.”
भ्रष्टाचाराच्या विरोधात तीव्र आंदोलनाची तयारी
संतोष ताटीकोंडावार यांनी यावेळी आणखी एक गंभीर बाब उघड केली. “सदर अधिकाऱ्याने जिल्ह्यात केवळ स्वतःच नव्हे तर इतर अनेक ठिकाणी भ्रष्टाचाराची साखळी तयार केली आहे. बांधकाम विभागासह अन्य काही विभागांमध्येही काही भ्रष्ट अधिकारी कार्यरत असून, त्यांची लवकरच पोलखोल करण्यात येणार आहे. आम्ही जनतेसमोर या सगळ्या काळ्या कृत्यांची माहिती आणणार असून, या विभागातील भ्रष्टाचाराविरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल.”
शासनाची भूमिका संशयास्पद?
ताटीकोंडावार यांनी असा सवालही उपस्थित केला की, “अशा प्रकारचे गंभीर प्रकार घडूनही बांधकाम विभागाने इतक्या वर्षांपासून या भ्रष्ट अधिकाऱ्याच्या कारवाया कशा काय लक्षात घेतल्या नाहीत? हे देखील एक मोठे प्रश्नचिन्ह आहे.” त्यांनी प्रशासनाकडे मागणी केली की, “यावर चौकशी समिती नेमून निष्पक्ष व सखोल तपास केला जावा.”
सत्यासाठी आवाज उठवणाऱ्यांना ब्लॅकमेलिंगचा धोका
या संपूर्ण प्रकरणात संतोष ताटीकोंडावार यांनी आणखी एक गंभीर मुद्दा उपस्थित केला. “ज्या लोकांनी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यावर ब्लॅकमेलिंगचे आरोप करून त्यांना गप्प बसवले जाते. हे प्रकार लोकशाहीसाठी घातक असून आम्ही यापुढे अशा घटनांना वाचा फोडणार आहोत.”
✍ संपादक – विदर्भ न्यूज 24
www.vidarbhanews24.com



