महानगरपालिका निवडणुकीचे कारण देत SBI बँक बंद
पूर्वसूचना नसल्याने अहेरीत नागरिकांचा उद्रेक; सहा महिन्यांपासून मॅनेजरविना शाखेचा भोंगळ कारभार उघड...

अहेरी विदर्भ न्यूज 24 प्रतिनिधी दिनांक १५ जानेवारी 2026
अहेरी तालुका मुख्यालयातील स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) शाखेचा कारभार सध्या पूर्णतः विस्कळीत अवस्थेत असून, बँक प्रशासनाच्या बेफिकिरीमुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि व्यापारी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील बँक असूनही ग्राहकांशी वागणूक खासगी दुकानासारखी दिली जात असल्याचा आरोप आता उघडपणे होत आहे.
आज १५ जानेवारी रोजी नागपूर महानगरपालिकेची निवडणूक असल्याचे कारण पुढे करून SBI अहेरी शाखेचे शटर पूर्णतः बंद ठेवण्यात आले. बँकेच्या प्रवेशद्वारावर “निवडणुकीमुळे आज व्यवहार बंद” असा फलक लावण्यात आला होता. मात्र, या निर्णयाची कोणतीही पूर्वसूचना ग्राहकांना देण्यात आलेली नव्हती, त्यामुळे सकाळपासूनच बँकेत व्यवहारासाठी आलेल्या नागरिकांची मोठी गैरसोय झाली.
अहेरीसह परिसरातील अनेक गावांमधून शेतकरी पीक कर्ज, पीक विमा, खाते अद्ययावत करणे, शासकीय योजनांचे पैसे काढणे तसेच कागदपत्रांच्या कामासाठी बँकेत आले होते. काही नागरिकांनी खासगी कामे बाजूला ठेवून, तर काहींनी रोजंदारी गमावून बँकेत हजेरी लावली होती. मात्र, बँक बंद असल्याचे समजताच नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला.
या प्रकारामुळे नागरिकांनी बँक प्रशासनाविरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. “नागपूर महानगरपालिकेची निवडणूक अहेरीशी कशी संबंधित आहे? बँकेतील सर्व कर्मचारी नागपूरचेच मतदार आहेत का? मतदानासाठी सुट्टी द्यायची होती तर किमान एक दिवस आधी सूचना देणे बँकेचे कर्तव्य नव्हते का?” असे सवाल उपस्थित करण्यात आले.
विशेष म्हणजे, गेल्या जुलै महिन्यापासून SBI अहेरी शाखेला कायमस्वरूपी मॅनेजर नाही. या गंभीर बाबीमुळे कर्ज प्रकरणे, महत्त्वाच्या कागदपत्रांवरील स्वाक्षऱ्या, खात्यांशी संबंधित तांत्रिक कामे आणि शेतकऱ्यांच्या पीक विम्याशी निगडित प्रक्रिया रखडल्या आहेत. ग्राहक वारंवार तक्रारी करूनही वरिष्ठ अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
कायमस्वरूपी व्यवस्थापक नसल्याने शाखेतील कर्मचारी देखील जबाबदारी झटकत असल्याचे चित्र दिसून येत आहे. परिणामी, बँकेचे कामकाज अनागोंदीत सापडले असून ग्राहकांना दररोज नवनव्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. आज बँक अचानक बंद ठेवल्याने या असंतोषाला उधाण आले आहे.
या संपूर्ण प्रकरणावर सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी तीव्र प्रतिक्रिया देताना सांगितले की, “सार्वजनिक क्षेत्रातील बँकेने ग्रामीण भागातील नागरिकांना अशा प्रकारे वाऱ्यावर सोडणे ही गंभीर बाब आहे. वारंवार तक्रारी करूनही बँक प्रशासनाला जाग येत नसेल, तर ही मुजोरी खपवून घेतली जाणार नाही. तातडीने या शाखेला कायमस्वरूपी मॅनेजर द्यावा आणि ग्राहकांच्या झालेल्या नुकसानीची दखल घ्यावी.”
नागरिकांनी बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह संबंधित प्रशासकीय यंत्रणेकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे. भविष्यात अशा प्रकारे कोणतीही पूर्वसूचना न देता बँक बंद ठेवण्यात येऊ नये, तसेच पर्यायी व्यवस्था करण्यात यावी, अशी ठाम मागणी होत आहे.
जर प्रशासनाने यावर तात्काळ उपाययोजना केल्या नाहीत, तर आंदोलनाचा मार्ग अवलंबण्याचा इशारा नागरिकांकडून देण्यात आला आहे. सार्वजनिक सेवेसाठी असलेल्या बँका जर अशा पद्धतीने वागत राहिल्या, तर ग्रामीण भागातील जनतेचा प्रशासनावरील विश्वास पूर्णतः ढासळण्याची भीती व्यक्त होत आहे.



