*मुख्यमंत्र्यांच्या पुढाकारातून चातगांवला नवीन पोलीस ठाणे*१४ नोव्हेंबरला होणार उद्घाटन*
१४ नोव्हेंबरला होणार उद्घाटन*

गडचिरोली/मुंबई विशेष प्रतिनिधी दिनांक: 12/11/2025
गडचिरोली जिल्ह्याच्या सुरक्षा व्यवस्थेच्या बळकटीकरणाच्या दिशेने पुढे जाताना धानोरा तालुक्यातील चातगांव येथे नवीन पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली असून, या ठाण्यासाठी एकूण 110 नवीन पदांची निर्मिती करण्यासही शासनाने मान्यता दिली आहे.
मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली गडचिरोली जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधला जात आहे. जिल्ह्याच्या नक्षलग्रस्त प्रतिमेला भूतकाळात सोडून, येथे मजबूत सुरक्षा यंत्रणा उभारण्याचा आणि शाश्वत विकासासाठी सुरक्षित वातावरण निर्मितीचा राज्य सरकारचा प्रयत्न सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पुढाकारातून चातगांव येथे स्वतंत्र पोलीस ठाणे उभारण्यात आले आहे.
*१४ नोव्हेंबर रोजी औपचारिक उद्घाटन – श्री निलोत्पल*
या पोलीस ठाण्याचे औपचारिक उद्घाटन १४ नोव्हेंबर रोजी करण्यात येणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री निलोत्पल यांनी कळविले आहे. चातगांव परिसरात ५० हून अधिक गावे जोडलेली असून, भौगोलिकदृष्ट्याही या भागाचे महत्त्व विशेष आहे. नवीन पोलीस ठाण्यामुळे येथे गस्त वाढविणे, गुन्हेगारी आणि नक्षल कारवायांवर नियंत्रण ठेवणे अधिक प्रभावीपणे शक्य होईल. तसेच नागरिकांना तात्काळ मदत व न्याय मिळण्यासही सुविधा निर्माण झाली आहे. यामुळे पोलीस व जनतेतील संवाद वाढून विश्वास, सहकार्य आणि शांततेचे वातावरण निर्माण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.



