# हत्तींच्या त्रासावर ट्रॅकुलाइज उपाययोजनेची चाचपणी; कायमस्वरूपी तोडग्यासाठी शासन गांभीर्याने प्रयत्नशील – सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल* – VIDARBHANEWS 24
विशेष वृतान्त

हत्तींच्या त्रासावर ट्रॅकुलाइज उपाययोजनेची चाचपणी; कायमस्वरूपी तोडग्यासाठी शासन गांभीर्याने प्रयत्नशील – सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल*

पिक नुकसानीची पाहणी, बाधितांना दिला दिलासा* *मुख्यमंत्र्यांकडून वाढीव नुकसान भरपाईसाठी हमी*

गडचिरोली विदर्भ न्यूज 24 नेटवर्क दिनांक:-24/09/2025

गडचिरोली जिल्ह्यात जंगली हत्तींच्या हल्ल्यामुळे होत असलेल्या पिकांच्या नुकसानीवर आणि जीवितहानीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी शासन गांभीर्याने प्रयत्नशील आहे. हत्तींचे हालचाली नियंत्रणात आणण्यासाठी त्यांना ट्रॅकुलाइज करून वळविण्याची प्रक्रिया राबविण्याबाबत देहरादून येथील वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूटशी संपर्क साधण्यात येणार असल्याची माहिती वित्त व नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधि व न्याय, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वालयांनी दिली. तसेच हा प्रश्न मुख्यमंत्री यांच्या समक्ष मांडून शास्त्रोक्त उपाययोजना करण्याचा प्रयत्न होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

ॲड. आशिष जयस्वाल यांनी आज गडचिरोली जिल्ह्यात जंगली हत्तींमुळे आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या शेत पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, उपवनसंरक्षक बी. वरूण प्रामुख्याने उपस्थित होते.

*पिक नुकसानीची पाहणी व पंचनाम्यांचे निर्देश*

सहपालकमंत्री जयस्वाल यांनी गडचिरोली तालुक्यातील चुरचुरा, पिपरटोला-धुडेशिवणी, दिभणा या गावांतील हत्तींमुळे झालेल्या पिक नुकसानीची पाहणी केली. ठाणेगाव येथे अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या १२८ हेक्टर क्षेत्राची माहिती घेतली. यावेळी तात्काळ पंचनामे करून भरपाई प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.

*मयताच्या कुटुंबाला मदतीतून दिलासा*

चुरचुरा येथील १० सप्टेंबर रोजीच्या हत्ती हल्ल्यात मृत्यू झालेल्या वामन गेडाम यांच्या कुटुंबीयांना सहपालकमंत्री जयस्वाल यांच्या हस्ते १० लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. त्यांना एकूण २५ लाख रुपयांची मदत जाहीर असून ती टप्प्याटप्प्याने दिली जाणार आहे.

*तक्रारींचे निवारणासाठी जनता दरबार घेणार*

गावकऱ्यांशी संवाद साधताना नागरिकांनी हत्ती गावात येऊ नयेत अशी उपाययोजना करण्याची मागणी तसेच नुकसानीची मदत तमिळण्यासाठी येणाऱ्या अडचणी व विविध तक्रारी मांडल्या. यावर सहपालकमंत्री ॲड जयस्वाल यांनी वनविभागाने संवेदनशीलतेने बाधितांना वेळीच मदत द्यावी, तसेच शासन लवकरच ५० हजार रुपये प्रति एकर मदतीचा निर्णय घेणार असल्याचे सांगितले. त्यांनी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात आलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने प्रत्येक तालुक्यात जनता दरबार घेऊन समस्या सोडविण्याची हमीही दिली.

*मुख्यमंत्र्यांशी थेट संपर्क*

पिपरटोला-धुडेशिवणी येथे ग्रामस्थांच्या उपस्थितीत सहपालकमंत्री जयस्वाल यांनी वाघ व हत्तींची समस्या, नुकसानभरपाईची कमी मिळणारी रक्कम, वनपट्टे, तसेच पाणंद रस्ते या गंभीर प्रश्नांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला. यावर मुख्यमंत्र्यांनी लवकरच सकारात्मक निर्णय घेऊन जिल्हावासीयांना दिलासा दिला जाईल, असे आश्वासन दिले.
या पाहणीवेळी उपविभागीय अधिकारी रणजित यादव व अनुष्का शर्मा, अतिरिक्त जिल्हाधिकारी नितीन गावंडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर, तहसीलदार उषा चौधरी, तसेच राकेश बेलसरे, चंद्रशेखर भडांगे व अनेक मान्यवर उपस्थित होते.

मुख्य संपादक

संदीप राचर्लावार, मुख्य संपादक विदर्भ न्यूज 24 नेटवर्क

शेअर करा.

मुख्य संपादक

संदीप राचर्लावार, मुख्य संपादक विदर्भ न्यूज 24 नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker